Join us

सावधान! तुमच्यासाेबत चाेरटेही करतात रेल्वे प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:49 AM

नववर्षाच्या आठ दिवसांत २८३ रेल्वे प्रवाशांना लुटले.

मुंबई : महामुंबईकरांची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करताना सावध राहा. प्रवाशांच्या गर्दीत चाेरटेही असतात, हे नववर्षाच्या आठ दिवसांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांमुळे उघडकीस आले आहे. या चाेरांनी २८३ प्रवाशांचा लाखाे रुपयांचा मुद्देमाल पळवला आहे.

रेल्वेच्या मध्य, हार्बर व पश्चिम मार्गावर दरराेज लाखाेंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. सकाळ व सायंकाळच्या सुमारास चाकरमान्यांची गर्दी असते. या गर्दीत व रात्री उशिरा चाेरटे प्रवाशांना टार्गेट करतात.  प्रवाशांचे माेबाइल, बॅगा, साेन्याचा ऐवज, पर्स-पाकीट, राेकड लुटण्याकडे चाेरांचा कल आहे. अनेक चाेर सध्या तुरुंगात असून उर्वरित चाेरांचा लाेहमार्ग पाेलिस शाेध घेत आहेत. 

आराेपींवर गुन्हे दाखल :

या गुन्ह्यांप्रकरणी कर्जत-कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पालघर ते चर्चगेट, हार्बर मार्गावरील पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान असलेल्या पाेलिस ठाण्यांंमध्ये नाेंद करण्यात आली आहे.

पूर्वीच्या तुलनेत गुन्हे घडण्यात लक्षणीय घट झाली असून गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच कोर्टात गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणात आमचे आयुक्तालय राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. प्रत्येक स्थानकात लाेहमार्ग पाेलिस तैनात असतात. प्रवासादरम्यान प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी १५१२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. - डाॅ. रवींद्र शिसवे, पाेलिस आयुक्त, मुंबई लाेहमार्ग

टॅग्स :मुंबईरेल्वे