‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:02+5:302021-06-02T04:06:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तुमच्या मोबाइल सिम कार्डचे व्हेरिफिकेशन पेंडिंग असून, तत्काळ प्रक्रिया पूर्ण न केल्यास सेवा बंद ...

Beware of 'SIM Verification Pending' message! | ‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान!

‘सिम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तुमच्या मोबाइल सिम कार्डचे व्हेरिफिकेशन पेंडिंग असून, तत्काळ प्रक्रिया पूर्ण न केल्यास सेवा बंद होईल, अशा आशयाचे मेसेज कोरोनाकाळात प्रत्येकाच्या मोबाइलवर आले असतील, पण सावधान... त्या लिंकवर क्लिक करून व्हेरिफिकेशन करायला जाल तर हॅकर्सच्या जाळ्यात अडकाल, असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.

दूरसंचार कंपन्यांच्या नावे बनावट मेसेज पाठवून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. सिम कार्डचे ऑनलाइन व्हेरिफिकेशन करायला सांगून त्याद्वारे ग्राहकांचा मोबाइल हॅक करण्याची नवी शक्कल हॅकर्स लढवित आहेत. बँक खात्याचा तपशील, पासवर्ड, खासगी आणि गोपनीय माहितीवर डल्ला मारून ग्राहकांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. त्यामुळे असे मेसेज मोबाइलवर आले असतील तर ते तत्काळ डिलीट करावेत. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी दहा वेळा खात्री करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

...............

मुंबईत नोंद झालेले सायबर गुन्हे

२०१९ – २,२२५

२०२० – २,४३५

२०२१(एप्रिलपर्यंत) – ७,७७

....................

खात्री केल्याशिवाय ॲप डाऊनलोड करू नका

हल्ली वेगवेगळ्या ॲपची वावटळं उठली आहेत. फोटो एडिटिंग, कॉल रेकॉर्डिंग किंवा आणखी काही. मोबाइल गॅलरी, फोन कॉल्स आणि इतर महत्त्वाच्या बाबी हाताळण्याची परवानगी दिल्याशिवाय ते कार्यान्वित होत नाहीत. त्यामुळे खात्री केल्याशिवाय कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका, अन्यथा सर्व खासगी माहिती चोरी होईल.

.............

असा कॉल वा मेसेज आल्यास सावधान

- अमुक बँकेतून बोलत असून, तुमच्या खात्याची केवायसी करायची आहे, त्यासाठी खाते क्रमांक सांगण्याचे आवाहन केले जाते. बोलण्यात गुंतवून मोबाइलवर आलेला ओटीपी, डेबिट कार्ड नंबर घेऊन खात्यातील पैसे वळविले जातात.

- लिंकवर क्लिक करून प्रश्नांची अचूक उत्तरे द्या आणि लाखोंचे बक्षीस जिंका, अशा मेसेजचे प्रमाणही हल्ली वाढले आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर ग्राहकाचा मोबाइल हॅक करून त्याद्वारे सर्व महत्त्वाचा तपशील मिळवून फसवणूक केली जाते.

- त्यामुळे असे कॉल आणि मेसेजपासून सावध राहा. कोणालाही आपल्या बँकेचा तपशील, ओटीपी किंवा अन्य माहिती देऊ नका, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

............

घाबरू नका... मुंबई पोलीस तुमच्या सोबत आहे

- गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. मुंबईत आधी एक सायबर ठाणे होते, आता प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र्य सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्याची क्षमता कैकपटीने वाढली आहे.

- विभागस्तरावर ठाणे असल्याने तक्रारी दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कुशल मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- पुरेशी खात्री केल्यानंतरच ऑनलाइन व्यवहार करावेत. आमिषांपासून दूर राहा, वैध आणि मान्यताप्राप्त संकेतस्थळांवरूनच व्यवहार करा. कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास घाबरू नका, मुंबई पोलीस तुमच्या सोबत आहेत, अशी प्रतिक्रिया पोलीस प्रवक्ते (उपायुक्त) एस. चैतन्य यांनी दिली.

Web Title: Beware of 'SIM Verification Pending' message!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.