पावसाळ्यात सापांपासून सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:20+5:302021-06-17T04:06:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पावसाळा सुरू झाला की मुंबईत मानवी वस्तीतही साप दिसून येतात. विशेषतः झोपडपट्टी भागांत गटार, ...

Beware of snakes in the rainy season! | पावसाळ्यात सापांपासून सावधान!

पावसाळ्यात सापांपासून सावधान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पावसाळा सुरू झाला की मुंबईत मानवी वस्तीतही साप दिसून येतात. विशेषतः झोपडपट्टी भागांत गटार, ड्रेनेज लाईनमधून मोठमोठाले साप घरात शिरल्याची प्रकरणे गेल्या काही वर्षांत उघडकीस आली आहेत. पण प्रत्येक साप हा विषारी नसतो. त्यामुळे घाबरून न जाता त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सापांचे वास्तव्य हे प्रामुख्याने बिळे, दगडांमधील फटी आणि अडगळीच्या ठिकाणी असते. पावसाळ्यात सापांच्या वसतिस्थानात पाणी शिरले की ते बाहेर पडतात आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा मलजल वाहिनीतून वाहून येणारे साप शौचालय किंवा मोरीच्या पाईपमधून घरात शिरतात. अशावेळी सापाला लाठ्याकाठ्यांनी न मारता सर्पमित्रांना पाचारण करावे. मुंबईत आढळणाऱ्या सापांच्या प्रजातींपैकी नाग आणि घोणस हेच विषारी आहेत. त्यामुळे घाबरून न जाता त्याला जीवदान देण्यासाठी जास्ती जास्त प्रयत्न करावेत. कारण तोही एक जीव आहे, असे आवाहन सर्पमित्र भरत जोशी यांनी केले.

* मुंबईत आढळणारे विषारी साप

१) नाग - नाग ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकटकाळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. आपल्याकडे तपकिरी आणि काळ्या रंगातील नाग जास्त आढळतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर परिणाम करते. मेंदूद्वारे नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने एक ते दीड तासात जीव जाण्याची शक्यता असते.

२) घोणस - घोणसाच्या अंगावर साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. हिरवा, पिवळा, करडा व इतर अनेक रंगछटांमध्ये घोणस आढळतात. त्यांचे विष अतिशय जहाल असते. ते मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते. चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍ऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. विषावर प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.

* मुंबईत आढळणारे बिनविषारी साप

धामण, पाणसर्प (पाणदिवड), अजगर, नानेटी

* साप दिसला तर काय कराल...

साप दिसल्यास त्याला मारू नये. तो लपण्याची शक्यता असलेल्या जागांपासून म्हणजे कपाटामागे, अडगळीत, तसेच आतील खोलीत जाण्यापासून रोखावे. सापाला घरातून बाहेर हुसकावताना लांब काठी, तारेचा आकडा, छत्रीच्या आकड्याचा उपयोग करून मानवी वस्तीपासून दूर सोडावे. साप घरात शिरल्यास तातडीने सर्पमित्रास बोलवावे.

* साप चावला तर...

- सर्वसाधारणपणे हाताला किंवा पायाला सर्पदंश होतो. विषारी साप चावला तर अर्धलंबवर्तुळाकार दोन ठळक खुणा दिसतात. खुणा नसल्या तर तो बिनविषारी साप असेल. सर्पदंश झालेल्या अवयवापासून काही अंतरावर इलॅस्टिक क्रेप बँडेज किंवा आवळपट्टीने बांधावे. घट्ट आवळून बांधल्यामुळे विष शरीरात पसरण्यापासून रोखले जाते आणि वैद्यकीय उपचारांसाठी वेळ मिळतो.

- एक ग्लास पाण्यात पोटॅशिअम परमँगनेट मिसळून त्याची संततधार सर्पदंश झालेल्या भागावर सोडत रहावी. सापाच्या विषात २६ विषघटक असतात. त्यापैकी ५० टक्के विषघटकांचे निराकरण या माध्यमातून होते. प्रथमोपचारानंतर शक्य तितक्या लवकर चारचाकीने संबंधितास रुग्णालयात दाखल करावे.

* प्रत्येकाने प्रयत्न करायला हवी

सर्प हा माणसाचा मित्र आहे. तो स्वत:हून कधीच इजा पोहोचवत नाही. सापाच्या विषापासून प्रतिविषे तयार केली जातात. विषारी साप नष्ट झाले तर अशी औषधे तयार करायची कुठून, ही समस्या उभी राहील. ही बाब लक्षात घेऊन सापांना जीवदान देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत.

- भरत जोशी, सर्पमित्र

.........................................

Web Title: Beware of snakes in the rainy season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.