मुंबई : ७३ टक्के भारतीय आहारांत प्रथिनांची कमतरता असल्याचे नुकत्याच एका अभ्यासातून समोर आले आहे. भारतातील ८४ टक्के शाकाहारी आणि ६५ टक्के मांसाहारी आहारांत प्रथिनांची कमतरता असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविले आहे. ९३ टक्के भारतीयांना त्यांच्या प्रथिन गरजांबाबत माहितीच नसल्याचे या अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे आता प्रथिनांची कमतरता असलेला आहार आणि प्रथिनांविषयी जागृतीच्या अभावी सामान्य नागरिक प्रथिनवंचित राहिलेले दिसून आले आहे.भारतातील सर्वाधिक कमी माहिती असलेल्या पोषक द्रव्यांमध्ये प्रथिनाचा समावेश असल्याचे दिसून आले. नुकत्याच एका संशोधन संस्थेने ‘अंडरस्टँडिंग प्रोटीन मिथ्स अॅण्ड गॅप्स अमंग इंडियन्स’ या विषयावरील देशव्यापी अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले. या सर्वेक्षणात देशाच्या चारही विभागांतील मिळून १८०० भारतीयांचा अभ्यास केला गेला, ज्यातून प्रथिने आणि प्रथिनांचे सेवन या दोन्हीतील जागृती पातळ्यांतील लक्षणीय त्रुटी समोर आल्या आहेत.या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक प्रथिन कमतरता लखनऊ शहरात असून, येथील ९० टक्के लोकसंख्येत प्रथिनांची कमतरता दिसून आली आहे. तर कोलकाता हे सर्वोत्तम प्रथिन संतुलन राखणारे शहर असल्याचे दिसून आले. या ठिकाणी केवळ ४३ टक्के लोकसंख्येत प्रथिने कमी असल्याचे आढळले आहे. प्रथिन कमतरतेच्या विभागवार विश्लेषणानुसार, अहमदाबाद व चेन्नई (८४ टक्के), विजयवाडा (७२ टक्के), मुंबई (७० टक्के) अशी क्रमवारी आहे. कोलकात्यात मात्र निम्म्याहून कमी लोकसंख्येच्या (४३ टक्के) आहारात प्रथिनांची कमतरता आढळून आली. विविध उपभोक्ता गटांकडे बारकाईने पाहिल्यास गृहस्थ पुरुषांत प्रथिनांची कमतरता सर्वाधिक (७५ टक्के), तर त्याखालोखाल मातांमध्ये (७२ टक्के) असल्याचे दिसून येते. प्रथिन कमतरतेच्या दुष्परिणामांबाबत भारतीयांत सामान्यत: फारशी जाणीव नसल्याचे दिसून आले. सर्वेक्षणात केवळ एक तृतीयांश प्रतिसाददात्यांनी मान्य केले, की प्रथिनाच्या अभावी अशक्तता आणि दमा ही लक्षणे दिसतात.या अभ्यासात प्रतिसाददात्यांच्या आहार प्रारूपाचेही विश्लेषण करण्यात आले. सर्वाधिक प्रथिन कमतरता शाकाहारी व्यक्तींत ८४ टक्के इतकी चिंताजनक दिसून आली. मांसाहारातून पुरेशी प्रथिने मिळतात, या लोकप्रिय धारणेच्या विरुद्ध असे निरीक्षण दिसून आले. त्यानुसार भारतातील ६५ टक्के मांसाहारी आहारांत प्रथिनांच्या विहित पातळ्यांची कमतरता आढळली. आरोग्याच्या फायद्यासाठी कोणत्या पोषण द्रव्यांची शिफारस कराल, असे विचारता प्रतिसाददात्यांनी प्रथिनाला सर्वाधिक म्हणजे ५३ टक्के, कॅल्शियमला ४८ टक्के, जीवनसत्त्वांना ४३ टक्के, लोहाला ३४ टक्के व कर्बोदकांना ३२ टक्के पसंती दर्शवली.
भारतीय आहारांत प्रथिनांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:12 AM