Join us  

भाभा यांच्या बंगल्याची सुनावणी २३ जूनला

By admin | Published: June 18, 2014 2:41 AM

भारतीय अणुसंशोधनाचे जनक डॉ़ होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील बंगल्याचा लिलाव न करता ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करावी,

मुंबई : भारतीय अणुसंशोधनाचे जनक डॉ़ होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील बंगल्याचा लिलाव न करता ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर २३ जूनला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे़ अ‍ॅड़ विक्रम वालावलकर यांनी सोमवारी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाचे या याचिकेकडे लक्ष वेधले़ त्यावर न्यायालयाने या याचिकेवर वरील तारखेला सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले़अणुऊर्जा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मोतीराम वरळीकर व इतरांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे़ डॉ़ भाभा यांनी बॉम्बे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून १९३७ मध्ये हा बंगला घेतला़ आई मेहरबाई व वडील जहांगीर ही दोन नावे एकत्रित करून त्यांनी या बंगल्याचे नाव मेहरंगीर असे ठेवले़ अशा या महान संशोधकाच्या निधनानंतर या बंगल्यात त्यांचे भाऊ जमशेद राहत होते़ जमशेद हे एनसीपीएचे संस्थापक-सदस्य आहेत़ त्यामुळे त्यांच्यानंतर एनसीपीएने बंगल्याच्या जागेचा विकास करण्याचे ठरवले व त्यासाठी इच्छुकांच्या निविदा मागवल्या़ हे गैर असून डॉ़ भाभा यांच्यासारख्या महान संशोधकाच्या बंगल्याचा लिलाव न करता ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे़ (प्रतिनिधी)