Join us

रिफायनरीवरून भडका, बड्या नेत्यांमध्ये जुंपली; ठाकरे-फडणवीस सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 6:28 AM

ठाकरेंनीच दिलेला त्या जागेचा प्रस्ताव : फडणवीस; आंदाेलकांच्या पाठीशी राहण्याचे उद्धव यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बारसू (जि. रत्नागिरी) येथील तेल रिफायनरीवरून तीव्र झालेले स्थानिक गावकऱ्यांचे आंदोलन, आंदोलकांवरील पोलिसांची कारवाई यावरून राज्यातील बड्या नेत्यांमध्ये जुंपली असून रिफायनरीचा राजकीय भडका उडाला आहे. आज विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंनीच बारसूमध्ये हा प्रकल्प करावा, असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. बारसूतील घटनाक्रमानंतर शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर स्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली आणि आंदोलकांच्या पाठीशी उभे राहण्याचे आदेश दिले. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी तेथील सर्वेक्षण आणि पोलिसांची दडपशाही तातडीने थांबवा. स्थानिकांशी संवाद साधा, फायदा कोणाचा होणार ते सांगा, अशी भूमिका पत्रकारांसमोर मांडली. प्रकल्पाला विरोध करणारे स्थानिक किती आहेत अशी शंका उपस्थित करत मंत्री दीपक केसरकर यांनी आम्ही ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावू, असे पत्रकारांशी बालताना सांगितले. 

आंदोलकांनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या बारसू परिसरातील मातीचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेले अधिकारी व पोलिसांच्या गाड्या ग्रामस्थांनी अडविल्या. महिला आंदोलनकर्त्या रस्त्यावर झोपल्याने सर्वच ताफा अडकून राहिला. पोलिसांनी जवळपास १५० लोकांना ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वांचा पुढे जाण्याचा मार्ग सुकर झाला.

पवारांचा सामंतांना फोनराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन करून लोकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प करा, असे सांगितले. सर्व्हे थांबवा, स्थानिकांशी चर्चा केली नाही तर प्रकल्प अडचणीत येईल. अटक केलेल्यांची सुटका करा, असेही पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सरकारची भूमिका कळवली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. 

आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. या विरोधाची सुपारी कुणाकडून घेतली आहे? उद्धव ठाकरे विकासाला आडवे जात आहेत. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणाऱ्यांना खपवून घेणार नाही.     - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तत्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा.     - अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते 

बारसूच्या प्रकल्पस्थळी पोलिसांची दडपशाही निषेधार्ह आहे. सरकारने तेथील सर्वेक्षण तत्काळ थांबवावे.     - बाळासाहेब थोरात,     काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते 

 

 

टॅग्स :रत्नागिरीउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस