मुंबई - हिवाळी अधिवेशनालाही विधानसभा अध्यक्षांची निवड न झाल्याने आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड होईल का, याची चर्चा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यापल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्ष निवडीसाठीचे पत्र त्यांना दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील नेते आणि मंत्र्यांची स्वाक्षरी असलेले पत्र राज्यपालांना देण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 24/06/2021 रोजी आपणास निर्देश दिलेले होते. त्यानंतर, डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशन कालावधीतही अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तारीख निश्चित करण्यासंदर्भात आपणास विनंती करण्यात आली होती. मात्र, अद्यापही तारीख निश्चित करुन देण्यात आली नाही. दरम्यान, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडून 21 फेब्रुवारी 2022 रोजी आपणास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे, लवकरात लवकर या प्रस्तावास मान्यता द्यावी, अशी विनंती महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेतेमंडळींनी केली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने महाविकास आघाडीच्या तीन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने डिसेंबर महिन्यात राज्यपालांकडे सुपूर्द केला. मात्र यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कायदेशीर सल्ला घेणार होते. त्यामुळे, हिवाळी अधिवेशनात अध्यक्षपदा निवड झालीच नाही.
मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीला महत्त्व
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठीची तारीख राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर निश्चित करावयाची असते. विधिमंडळांच्या नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीला महत्त्व असल्याचे महाराष्ट्र विधिमंडळाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव व विधिमंडळ कामकाजाचे तज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले होते.