मुंबई : राजश्री लॉटरीची शाखा चालवताना एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने तशीच हुबेहूब भाग्यश्री आॅनलाइन लॉटरी सुरू केली. याच आॅनलाइन लॉटरीद्वारे फसवणूक करत मोबाइलद्वारे सट्टा सुरू करणाऱ्या या बादशहाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मास्टरमाइंड कादर बादशहा अल्लाहबक्श शेख (४२) याच्यासह अल्पेश जमनादास भाटिया (३४), जहिरुद्दीन शेख (४५) आणि नरेंद्र पुरुषोत्तम कनानी (५२) या चौकडीला गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत.मूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेल्या बादशहाने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण करून मुंबई गाठली. येथे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. यात तो मास्टर बनला. मुंबईतील राजश्री लॉटरीची शाखा चालविण्याचे काम त्याला मिळाले. अशातच जीएसटीमुळे लॉटरी व्यवसायात मिळणारे कमिशन कमी झाले. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने राजश्री लॉटरीसारखीच हुबेहूब ‘भाग्यश्री आॅनलाइन लॉटरी’ची वेबसाइट तयार केली. त्याने या वेबसाइटचे सर्व्हर कॅनडामधून नोंदणी करून घेतले. चारकोपमधील एका पतपेढीच्या पोटमाळ्यावर त्याने बनावट लॉटरीच्या साइटवरून फसवणुकीचा धंदा सुरू केला.राजश्री लॉटरीवरील सर्व माहिती तो भाग्यश्री लॉटरीवर अपडेट करीत असे. तसेच त्याने स्वत:चे ‘आरबी’ नावाने अॅप तयार केले. यामध्ये त्याने राजश्री लॉटरीच्या वितरकांना हाताशी घेतले. त्याच्या लॉटरीबाबत वितरकांना तसेच जवळच्या मित्रमंडळी, नातेवाइकांना तो माहिती देत असे. तसेच मोबाइलद्वारे सट्टा, जुगारही त्याने सुरू केला होता.बनावट आॅनलाइन लॉटरीद्वारे शासनाची फसवणूक होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे प्रकटीकरण कक्ष १चे पोलीस उपायुक्त निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ११चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकाने मालवणीच्या स्कॉटर्स कॉलनी येथील राजश्री लॉटरी सेंटरवर छापा टाकला. तेथील तपासात बादशहाचा पर्दाफाश झाला. त्यापाठोपाठ कांदिवली येथील कार्यालयातही छापे टाकण्यात आले. यामध्ये बादशहासह चौघांना अटक करण्यात आली.दिवसाला २० ते ३० हजारांची कमाईगेल्या सहा महिन्यांपासून बादशहाचा हा धंदा सुरू होता. यातून दिवसाला त्याला २० ते ३० हजार रुपयांची कमाई होत असल्याचेही समोर आले आहे.८ मोबाइलसह६ संगणक जप्तआरोपींकडून ६ संगणक, ८ मोबाइल, २ ईडीसी मशीन, १ प्रिंटर, १ स्कॅनर, १ राऊटर, चिठ्ठी व लॉटरी प्रिंट करण्याच्या साहित्यासह ३ लाख २८ हजार २८० रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
भाग्यश्री लॉटरीचा ‘बादशहा’ गजाआड, बनावट आॅनलाइन लॉटरीद्वारे शासनाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 2:17 AM