Join us

कॅनव्हासवर उमटली मंत्राक्षरांसह भक्ती अन् शक्ती; सुलेखनकार सुभाष जमदाडेंसह चित्रकार सुरेश गोसावी यांचे कलाप्रदर्शन

By स्नेहा मोरे | Published: December 27, 2023 7:35 PM

सुरेश गोसावी आणि सुभाष जमदाडे या दोघांनीही पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून कलाशिक्षण घेतले आहे.

मुंबई - चित्रकार व सुलेखनकार सुभाष जमदाडे यांच्या 'मंत्राक्षरे' व चित्रकार सुरेश गोसावी यांच्या 'भक्ती आणि शक्ती' या विषयावरील चित्रकृतींचे १ जानेवारीपर्यंत कला रसिकांना कुलाबा येथील जहांगीर कला दालनात पाहता येणार आहे. या कलादालनात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहिल. एकाच वेळी सुलेखानात्मक सृजनशीलता आणि भक्ती-शक्तीतून उमटणारे भावतरंग कॅनव्हासवर उतरविण्याचा प्रयत्न या कलाकारांनी केला आहे.

सुरेश गोसावी आणि सुभाष जमदाडे या दोघांनीही पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून कलाशिक्षण घेतले आहे. सुभाष जमदाडे हे सुलेखनकार म्हणून परिचित आहेत. सुलेखनातून चित्रकृती साकारण्याचे कलाप्रयोग ते सातत्याने करत असतात. या वेळी त्यांनी हिंदू संस्कृतीतील अध्यात्म व उपासना मंत्र यावर सर्जनात्मक आविष्कारातून विलोभनीय कलाकृती साकारल्या आहेत. ओंकार आणि गायत्री मंत्र यांचा दृश्यानुभव पाहणाराला मंत्रमुग्ध करून एका उच्च अध्यात्मिक पातळीवर घेऊन जातो. चित्रातील अक्षर-आकारांची कलात्मक रचना, सुलेखनात्मक पार्श्वभूमी, रंगसंगती, रंगलेपनातील पोत, चित्रातील छायाप्रकाश, गतिमानता यामुळे कलाकृती पाहताना मनात ऊर्जात्मक भक्ती स्पंदने निर्माण होतात. याखेरीस, 'ओंकार' हा एक वैश्विक पवित्र ध्वनी असून त्याचे अवकाशातील चित्रात्मक ब्रम्हांड स्वरूप पाहताना अदृश्य सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. चित्रकाराच्या अनोख्या शैलीतील श्री गणेशाचे अदभुत अमूर्त रूप पाहताना साक्षात चैतन्याचा अविष्कार वाटतो.

सुरेश गोसावी यांनी नैराश्यातून एकाग्रतेकडे, सुखाकडून समाधानाकडे जाण्यासाठी भक्ती आणि श्रद्धा आवश्यक असते ती चित्ररुपात साकारली आहे. भक्ती आणि शक्ती या प्रदर्शनातून कुतूहल व निरागसतेचे रूप म्हणजे लहान मुले, भक्तीचे रूप म्हणजे वारकरी, शक्तीचे रूप म्हणजे महाकाय हत्ती, श्रद्धास्थानी देवदेवतांची अनोखी रूपे अशा अनेक प्रतिकात्मक घटकांच्या सहज सोप्या मांडणीतून प्रभावी रंगलेपनातून चित्राविष्कार पाहताना मनाला भक्तिमय, सुखद व अंतर्मुख करणारा अनुभव मिळतो. 

टॅग्स :मुंबई