'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन', असा उपदेश करणारा आणि 'संभवामि युगे युगे' अशी ग्वाही देणारा श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णूंचा आठवा अवतार. बालपणीच्या त्याच्या लीला ते कुरुक्षेत्रावर त्यानं केलेलं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य हे सारं विलक्षण, अलौकिकच. मग ते कंसाचा वध असो, कालियामर्दन किंवा गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून धरणं. या सगळ्यावरचा कळसाध्याय म्हणजे, श्रीकृष्णानं सांगितलेली भगवद्गीता. जीवनाचं सार सांगणारी... 'धर्मा'चं ज्ञान देणारी...
श्रीकृष्णाची रूपं मन मोहून टाकतात, भारावून टाकतात. त्याचं जीवनचरित्र नाट्यमय घडामोडींनी भरलेलं आहे. साक्षात भगवंताचा हा भव्य जीवनपट सुमारे १०७ दुर्मिळ चित्र, शिल्प, मूर्ती आणि अन्य ऐतिहासिक वस्तूंमधून मांडण्याचं शिवधनुष्य अश्विन ई राजगोपालन यांनी पेललं आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (NMACC) आर्ट हाऊसमध्ये साकारलेलं 'भक्तीः द आर्ट ऑफ कृष्णा' हे प्रदर्शन कलाप्रेमी आणि कृष्णभक्तांसाठी पर्वणीच आहे. आर्ट हाऊसच्या चार मजल्यांवर श्रीकृष्णाच्या आयुष्यातील चार टप्पे - जन्म-बालपण, तारुण्य, कुरुक्षेत्रावरील उपदेश आणि देवत्व - अत्यंत कलात्मक पद्धतीनं मांडण्यात आलेत.
या 'भक्ती'मय प्रवासाची सुरुवात होते, ती एका अंधाऱ्या खोलीतून. कारण, श्रीकृष्णाचा जन्म तशाच वातावरणात झाला होता. तो अंधार प्रतिकात्मकही आहे. त्या खोलीतील महान चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या कल्पनेतून साकारलेलं कृष्णजन्मांचं चित्र मनावर कोरलं जातं. राजा रवि वर्मांचं हे चित्र २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच फतेह सिंग म्युझियममधून बाहेर एखाद्या प्रदर्शनात मांडण्यात आलंय. इथे राजा रविवर्मांची चार चित्र आहेत. तो श्रीकृष्ण पाहणं ही वेगळीच अनुभूती आहे. एम एम हुसैन यांची दोन चित्रंही या प्रदर्शनात आहेत. कृष्ण आणि राधा यांची चित्रं लक्षवेधी आहेतच, पण कुरुक्षेत्रावर गेलेल्या श्रीकृष्णाची वाट पाहणारी रुक्मिणी, हे अल्लाह बक्श यांचं पेंटिंगही त्या दोघांमधील गोड नात्याचं दर्शन घडवतं. मनजीत बावा, अमित अंबालाल, रकिब शॉ अशा १५ भारतीय चित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शनात आहेत. 'तीमिरातून तेजाकडे' आपण चालत राहतो आणि नवनवा कृष्ण आपल्याला भेटतो.
वेगवेगळ्या साम्राज्यातील श्रीकृष्णाच्या मूर्ती प्रदर्शनात पाहायला मिळतात. उत्तरेतील कृष्ण आणि दक्षिणेतील कृष्ण यांची रूपं वेगवेगळी असली, तरी लोभसवाणी आहेत. त्या-त्या काळात, तेव्हाच्या कलाकारांनी श्रीकृष्ण कसा रेखाटला, हे पाहणंही रंजक आहे. एका मजल्यावर एका काचेच्या पेटीत हाताने लिहिलेली भगवद्गीता पाहायला मिळते, तर शेजारच्या भिंतींवर गीतेतील काही श्लोक कोरले आहेत.
कुरुक्षेत्रावर उतरण्याआधीची अर्जुनाची संभ्रमावस्था मल्टिमीडियाचा वापर करून अत्यंत चपखलपणे दाखवण्यात आलीय आणि पुढे एका व्हिडीओतून विश्वरूपदर्शनाचं दृश्यंही प्रभावीपणे दाखवण्यात आलंय. प्रदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यात देशातील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तींच्या प्रतिकृती मांडण्यात आल्यात. त्या पाहून मन प्रसन्न होतं.
१००० वर्षांचा काळ आणि अनेक संस्कृतींचं दर्शन घडवणारं 'भक्तीः द आर्ट ऑफ कृष्णा' हे प्रदर्शन १८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून अधिक माहिती NMACC च्या वेबसाईटवर पाहता येईल.