बाणगंगा परिसरात विकसित होणार ‘भक्तिमार्ग’; ४.५ कोटी खर्च अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:40 AM2023-12-19T09:40:47+5:302023-12-19T09:46:02+5:30

मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धार प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

'Bhaktimarg' to be developed in Banganga area 4.5 crore expected to be spent in mumbai | बाणगंगा परिसरात विकसित होणार ‘भक्तिमार्ग’; ४.५ कोटी खर्च अपेक्षित

बाणगंगा परिसरात विकसित होणार ‘भक्तिमार्ग’; ४.५ कोटी खर्च अपेक्षित

मुंबई :मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धार प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. बाणगंगा परिसराच्या स्वच्छतेसाठी आणलेल्या क्लिनिंग व्हॅनचेदेखील लोकार्पण यानिमित्ताने करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागामार्फत बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धारासाठी विविध कामे केली जाणार आहेत. या कामासाठी साडेचार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

प्रकल्पाच्या जीर्णोद्धार कामांमध्ये बाणगंगा तलाव सभोवतालचा परिसर, रामकुंडालगतच्या परिसराची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्यांची तसेच संरक्षक भिंतींची आणि दीपस्तंभाची दुरुस्ती व जीर्णोद्धार, तलावाचे आतील बांधकाम काढणे, बटरफ्लाय झडप दुरुस्ती आणि सुधारणा अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. पालकमंत्री लोढा यांनी तलाव परिसरातील बांधकामे हटवून तलावाचा पुरातत्त्व वारसा जपण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेला निर्देश दिले होते. त्यानुसार या जीर्णोद्धार कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन :

  ‘डी’ विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे सनियंत्रणात ऐतिहासिक ठिकाणांचे पुनरुज्जीवन करण्यात येते. 
  वारसा स्थळांच्या यादीत ‘श्रेणी-१’मध्ये समाविष्ट असणाऱ्या या परिसराला जीर्णोद्धार कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन व आकर्षक रूप लाभणार आहे. 
  बाणगंगा तलाव परिसर जीर्णोद्धाराचाही समावेश आहे. हा प्रकल्प ‘विशेष प्राधान्य प्रकल्प’ म्हणून घोषित केले आहे.

 या बाबींचा समावेश :

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील एक रस्ता ‘भक्ती मार्ग’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर साजेसे माहिती फलक, आकर्षक पथदिवे, वाराणसीतील विकास प्रकल्पाच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, विहार मार्ग आदी बाबी प्रकल्पांतर्गत साकारण्यात येणार आहेत.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तलाव आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही कामेही पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभागाच्या संचालनालय यांच्या मार्गदर्शनानुसार व मुंबई वारसा संवर्धन समिती यांच्याशी समन्वय साधून करण्यात येत आहेत.- शरद उघडे, सहायक आयुक्त, डी विभाग

Web Title: 'Bhaktimarg' to be developed in Banganga area 4.5 crore expected to be spent in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई