भालचंद्र नेमाडे : अरे आपणच कसे काय जिवंत आहोत?

By अतुल कुलकर्णी | Published: October 27, 2024 10:24 AM2024-10-27T10:24:11+5:302024-10-27T10:24:51+5:30

सरकारने बजेटच्या 10% रक्कम केवळ भाषेच्या वाढीसाठी खर्च केली पाहिजे. आपण नुसत्या गप्पा मारतो. करीत काहीच नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Bhalchandra Nemade: How are we alive? | भालचंद्र नेमाडे : अरे आपणच कसे काय जिवंत आहोत?

भालचंद्र नेमाडे : अरे आपणच कसे काय जिवंत आहोत?

आपल्याकडे वेगवेगळ्या जाती-धर्मांत अनेक मोठे लेखक, विचारवंत झाले. अभिमान वाटावा असे साहित्य त्यांनी निर्माण केले. हे साहित्य वेगवेगळ्या भाषेत भाषांतरित करून जगाला हा ठेवा अभिमानाने सांगितला पाहिजे. सरकारने बजेटच्या 10% रक्कम केवळ भाषेच्या वाढीसाठी खर्च केली पाहिजे. आपण नुसत्या गप्पा मारतो. करीत काहीच नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 30 वर्षांनंतर नेमाडे यांचा ‘सट्टक’ हा कवितासंग्रह दिवाळीत प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी या भावना व्यक्त केल्या. त्यांच्याशी मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी केलेली बातचीत अशी...

एवढ्या वर्षांनी तुमचा कवितासंग्रह येत आहे. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर कविता लिहाव्यात असे तुम्हाला कधी वाटले?
या कविता एकदम लिहून झालेल्या नाहीत. मी अनेक वर्षे कविता लिहीत होतो. माझ्या मनात, कागदावर साचलेल्या काही कविता होत्या. दुसरा भाग माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांविषयी. मुली, नाती, आजी, प्रेयसी, आई अशा स्त्रियांच्या जगाविषयीच्या कविता होत्या. तिसरा भाग मृत्यूविषयीच्या कवितांचा आहे. मी गावाकडे ‘हिंदू’चा पुढचा भाग लिहिण्यासाठी गेलो होतो. मात्र, तिथे काही कविता मला मिळाल्या; आणि मी त्या कवितांमध्ये हरवून गेलो. ‘हिंदू’चे काम बाजूला पडले आणि कवितासंग्रह आला. आजपर्यंतच्या आयुष्यातल्या कवितांचे सार या पुस्तकात उतरले आहे. मध्ये ‘मेलडी’ हा कवितासंग्रह येऊन गेला. त्याच्या आधीच्या व नंतरच्या कविता यात आहेत.

तुम्ही अनेक कादंबऱ्या लिहिल्या. ‘ज्ञानपीठ’सारखा सर्वोच्च सन्मान मिळाला. मात्र, मी मूलतः कवी असल्याचा मला अभिमान वाटतो, असे तुम्ही का सांगता? 
निर्मितीच्या प्रक्रियेत कविता करताना विश्वाशी जास्त जवळचे नाते होते. कादंबरी लिहिताना सूत्र घेऊन काम करावे लागते. तिथे इकडचे-तिकडचे काही करता येत नाही. कवितेत एकदा तुम्ही शिरला की स्वतःला विसरून जाता. त्यामुळे मला कवितेचे क्षेत्र जास्त आवडते.

कवितेला बौद्धिकता चालत नाही, असे आपल्याला का वाटते? 
कवितेचा आणि बौद्धिकतेचा ३६ चा आकडा आहे. बौद्धिकतेत तुम्हाला काही प्रमेय गृहीत धरावी लागतात. कवितेत तशी बौद्धिकता चालत नाही. जे पटले ते तुम्ही सांगू शकता. मानवी विचार सांगताना, विश्वाशी एकरूप होता येते; म्हणून आपल्याकडे कवितेची मोठी परंपरा आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वर, तुकाराम अजूनही वंद्य आहेत. कवितेची भाषा तुम्हाला लोकांच्या खूप आतमध्ये नेते. ती अंतर्मनाची, नेणिवांची भाषा असते. ती विशाल वृत्तीची असते. म्हणून मला तसे वाटते.

कादंबरी लिहिणे कठीण की कविता लिहिणे..?
तसा कोणताच प्रकार मला कठीण वाटत नाही. लिहिताना खोटे बोलावे लागणे, हे नको ते नको असे करणे हे मला निंद्य वाटते. कविता तुमच्या अनकॉन्शेस माईंडमधल्या सगळ्या गोष्टी आहे तशा येऊ देते. बाकी लेखन प्रकारात असे स्वातंत्र्य घेता येत नाही, म्हणूनच मी बुद्धिवादाच्या विरुद्ध कविता असते असे म्हणतो. त्यामुळेच मला कवितेचा प्रकार आवडतो.

तुमच्या आधीची कविता, तुमच्या पिढीची कविता आणि आजच्या पिढीची कविता याबद्दल तुमचे मत काय आहे?
मुलींमध्ये, बायकांमध्ये कवितांचे आकलन अप्रतिम आहे. सावंतवाडी, कोल्हापूर, जळगाव अशा कितीतरी ठिकाणी मुलींनी, महिलांनी लिहिलेल्या कविता उत्कृष्ट आहेत. जळगावची शेतकऱ्याची मुलगी बहिणाबाईच्या परंपरेत जाऊन उत्तम लिहिते...

पुरुष कवी कमी होत आहेत की कसदार लिहीत नाहीत..?
मनातल्या खऱ्याखुऱ्या गोष्टी, प्रतिबिंब किंवा आजचे जग मुलींना जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त करता येते. मुलं किंवा पुरुष रॅशनल अथवा विवेकशीलतेच्या फंदात पडून बिघडतात. सगळ्यांच्याच बाबतीत असे होते असे नाही; पण, हा मी जनरल ट्रेंड सांगतो. आधीच्या काळातल्या कविता पुरुषी प्रभावाच्या होत्या. त्याआधी तसेच होते. रविकिरण वगैरे तर अधिक वाईट होते...

तुमच्या मते कवितेतून जेवढे सर्वव्यापी व्यक्त होता येते, तेवढे अन्य कोणत्या प्रकारात व्यक्त होता येते का?
अन्य कुठल्याही प्रकारातून तसे व्यक्त होता येत नाही. माझा तरी तसा अनुभव नाही. कादंबरीत जास्त खोलपर्यंत जाता येते. विशाल होता येते, असे म्हणणारा आजपर्यंत मला एकही माणूस सापडलेला नाही. कवितेला नेहमीच प्रथम दर्जा आहे.

वयाच्या या टप्प्यावर तुम्ही मृत्यूवरच्याएवढ्या कविता लिहिल्या. त्यामागे काय भावना होत्या? 
काही दिवसांपूर्वी मी आजारी पडलो, तेव्हा मला वाटले की आता आपले सगळे संपले. हल्ली दररोज जवळचा कोणीतरी मित्र, प्रेमाचा माणूस नाहीसा झाल्याच्या बातम्या येतात. आपल्याला वाटते की अरे आपणच कसे काय जिवंत आहोत. हा विचार आतपर्यंत खाेल गेल्यानंतर मला प्रश्न पडला की, मृत्यू कोणाला नेतो आणि कोणाला नाही? उत्तम लिहिणारी तरुण मुलं गेली आणि आपल्यासारखेच का मागे राहिले? याच्यामागे सृष्टीचा काय हेतू असावा? मग, डोक्यात चक्र चालू होते. त्यातून लिहिलेल्या कविता माझ्या विचारशैलीवर जास्त प्रकाश टाकणाऱ्या ठरल्या. म्हणून मला त्या लिहिता आल्या...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचा किती फायदा होईल? 
आपली मराठी वृत्ती त्याच्या आड येते. आपल्या भूमीवर, मूल्यांवर प्रेम करणे आजच्या काळात दिसत नाही. अभिजात दर्जाविषयी अभिमान असणे वेगळे. आपल्याकडे तो दुराभिमानाकडे जास्त जातो. त्यामुळे तुम्ही बघा, आपल्याकडे सुरू झालेल्या वाईट चळवळीसुद्धा देशात गाजतात. आपण आपले संचित बाहेरच्यांना जोपर्यंत देण्याचा विचारच करणार नाही तोपर्यंत अभिजात वगैरे राजकीय आहे...

मराठी भाषा जगात जावी यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते? 
आपल्याकडे एवढी मोठी शब्दसंपत्ती असून आजही आपल्याकडचे कसदार जीवन अनुभव घेऊन येणारे साहित्य जगात का पोहोचले नाही? अमेरिकेने हेमिंग्वेसारखी अनेक पुस्तके नाममात्र दरात जगात उपलब्ध करून दिली. रशियाने देखील टॉलस्टॉय, झेकॉव, पुलस्तिन अशा अनेक लेखकांचे साहित्य भाषांतरित करून जगभरात स्वस्त दरात नेले. आपल्याकडे वेगवेगळ्या जाती धर्मात अनेक मोठे लेखक, विचारवंत झाले. हा अभिमान आपण त्यांचे साहित्य जगात नेऊन दाखविला पाहिजे. मिरवला पाहिजे. सरकारने त्यांच्या बजेटच्या दहा टक्के खर्च भाषेवर केला पाहिजे. आपण तुकारामापासूनच्या फक्त गप्पा मारतो, करत काहीच नाही... मराठी बोला, मराठी वाचा, जगातल्या सर्वश्रेष्ठ संस्कृतीमध्ये मराठी संस्कृती आहे हे विसरू नका...

Web Title: Bhalchandra Nemade: How are we alive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई