Join us

वांद्रे शासकीय वसाहत दयनीय अवस्थेत, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 3:44 AM

वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीची दुरवस्था झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वसाहतीतील इमारती जीर्ण झाल्या आहेत. इमारतीचा कुठला ना कुठला भाग सतत पडत असतो

सागर नेवरेकरमुंबई : वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीची दुरवस्था झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वसाहतीतील इमारती जीर्ण झाल्या आहेत. इमारतीचा कुठला ना कुठला भाग सतत पडत असतो. वारंवार स्लॅब पडल्याने अनेक रहिवाशांना दुखापती झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनदेखील दुर्लक्ष केल्याची माहिती रहिवाशांनी दिली. शासकीय वसाहतीचे बांधकाम १९६१ साली करण्यात आले. क्लास १ ते ४ अशा विभागात शासकीय वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. यात क्लास १ व ४ मध्ये ११ इमारती आणि क्लास २ व ३ मध्ये ३५ चौक आहेत. प्रत्येकी चौकात १० इमारती असे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे येथे ४ हजार २०० घरांची मोठी वसाहत वसलेली आहे.शासकीय वसाहतीमधील इमारत क्रमांक सातमधील घर क्रमांक १०५९ येथे वास्तव्य करत असलेल्या रोशनी सोनवणे (वय ८) या मुलीच्या डोक्यावर स्लॅबचा तुकडा कोसळला. मुलगी निद्रावस्थेत असताना स्लॅब कोसळून तिच्या डोक्यावर मोठी जखम झाली. सुदैवाने मुलीचा जीव वाचला. हा प्रसंग घडल्यानंतर एकही सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी पाहणीसाठी आलेला नाही. वसाहतीच्या जवळपास कोणतीही सुखसुविधा नाही. अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदान नंबर १ वर घेतलेल्या सभेत शासकीय वसाहतीतील रहिवाशांना त्यांच्या मालकीच्या हक्काची घरे दिली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप आश्वासन पूर्ण झाले नाही. २०१६ साली सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय वसाहतीचा सर्व्हे केला. त्यानंतर दयनीय अवस्था असलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला. दुरुस्तीचे कामदेखील झाले. परंतु दुरुस्तीच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. त्यामुळे वारंवार इमारतीचा भाग कोसळतो, असे रहिवाशांनी सांगितले.अनंत चतुर्दशीला गावावरून नुकतेच घरी आलो. त्या वेळी दुपारच्या वेळेस झोपलेले असताना अचानक घराचा स्लॅब कोसळला. पंखा चालू असल्याने जीवितहानी झाली नाही. मुले घरात बसली होती. अचानक काय झाले या भीतीने मुले बाहेर पळाली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क केला असता, दुसºया दिवशी अधिकारी आले आणि वरवरचे काम करून गेले. दुसºया ठिकाणी पडण्यास आलेला स्लॅबचा तुकडादेखील दाखविण्यात आला. त्या वेळी अधिकाºयांनी उत्तरे दिली की, आणखी कामाला सुरुवात झाली की काम केले जाईल.- माधवी भुवड, रहिवासीशासकीय इमारतीमध्ये दर आठवड्याला वारंवार अपघात होत असतात. इमारतीची अवस्था बिकट झालेली आहे. कुठल्या ना कुठल्या घरातील स्लॅब कोसळत असतो. सर्व रहिवाशांना मालकी हक्काची घरे दिली जातील, असे आश्वासन अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी पाहणी केली. इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यात आले. परंतु दुरुस्तीच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. दुरुस्तीचे काम करून ५ महिनेदेखील झाले नाहीत. तरी इमारतीचा काही भाग कोसळत आहे.- संतोष कांबळे, रहिवासीमेट्रोमुळे धोकाशासकीय वसाहतीच्या परिसरात मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू आहे. काम प्रगतिपथावर असताना इमारतीला हादरे बसत असतात. त्यामुळे इमारतीला तडे जात असल्याचे रहिवाशांनी सांगितले.रहिवाशांना नोटीसभुयारी मेट्रोच्या कामामुळे ३चौक खाली करण्यात आले. इमारत खाली करताना प्रशासनाकडूनअसे सांगण्यात आले की, इमारती खचल्या असून धोकादायकझाल्या आहेत. त्यामुळे त्वरित इमारती खाली करा. तसेच इतरही इमारतींना नोटीस पाठविण्यात आली आहे.रहिवाशांनी काढला मोर्चाशासकीय वसाहतीतील रहिवाशांच्या वतीने सोमवारी सकाळी शासकीय वसाहत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चामध्ये वसाहतीतील १०० ते १२५ रहिवासी सहभागी झाले होते. रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना वसाहतीकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत जाब विचारला. यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामे सुरू होतील, असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी रहिवाशांना दिले.