भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:43 PM2024-11-29T12:43:43+5:302024-11-29T12:52:03+5:30
भांडुपच्या एका नामांकित शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Mumbai Crime: बदलापूरच्या शाळेतील अत्याचार प्रकरण ताजे असतानच मुंबईतही हादरवणारा प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या एका शाळेत तीन अल्पवयीन विद्यार्थीनींसोबत हा सगळा प्रकार केला. लिफ्टची दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने शाळेतील मुलींचा विनयभंग केला. शाळेच्या तळघरातच योग शिकणाऱ्या मुलींचा विनयभंग झाल्याने शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुलींच्या साक्षीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार केली होत पण शाळेने या प्रकरणात सहकार्य केले नाही, असाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
भांडुप परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत तीन चिमुरड्यांसोबत हा सगळा प्रकार घडला. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १.३० च्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या तळघरात एक १० वर्षांची आणि दोन ११-११ वर्षांच्या मुली योग शिकत होत्या. यावेळी शाळेतील लिफ्ट दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याने त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुलींनी शिक्षकाकडे या प्रकरणाची तक्रार केली आणि पालकांनाही घडलेला प्रकार सांगितला. तळघरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीनंतर ही बाब उघडकीस आली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसला. महत्त्वाची बाब म्हणजे लिफ्ट तळमजल्यावर संपते. पण लिफ्ट दुरुस्ती करणारा कर्मचारी तळघरात पडद्याआड लपलेला दिसत होता.
पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्यायिक संहिता ७४, ७८ आणि पोस्को कायद्याच्या कलम ८ आणि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोपाल गौडा असे आरोपीचे नाव असून तो २७ वर्षांचा आहे. पीडित मुलींच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, शाळेतील शिक्षकाने पोलिसांकडे जाऊ नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला होता. मुलीचे पालक शाळेत पोहोचल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही पाहण्याच मागणी केली असता सहकार्य केले गेले नसल्याचे कुटुंबियांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बदलापूरच्या एका नामांकित शाळेत काही महिन्यांपूर्वी तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. शाळेतीलच अक्षय शिंदे नावाच्या कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं होतं. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर बदलापूरात नागरिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक देखील केली होती. दरम्यान, तुरुंगातून चौकशीसाठी नेत असताना झालेल्या चकमकीत अक्षय शिंदे ठार झाला होता.