Join us  

भांडूप बालक मृत्यूप्रकरणी चौकशी समिती; सात दिवसांत मागवण्यात आला आहे अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 1:46 AM

नवजात शिशूच्या अति दक्षता विभागात अत्यावस्थेत असलेले बालक उपचारासाठी दाखल होत असतात.

मुंबई - भांडूप प्रसूतिगृहातील नवजात शिशू अतिदक्षता विभागातील चार बालकांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी पालिका प्रशासनाने समिती स्थापन केली आहे. यामध्ये सायन रुग्णालयातील नवजात शिशू अति दक्षता विभागाचे प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि बालरोग तज्ज्ञाचा समावेश आहे. या समितीकडून सात दिवसांमध्ये अहवाल मागविण्यात आला आहे. दरम्यान, दोन बालकांची प्रकृती आता उत्तम असून एकाची प्रकृती गंभीर आहे. 

नवजात शिशूच्या अति दक्षता विभागात अत्यावस्थेत असलेले बालक उपचारासाठी दाखल होत असतात. सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील अति दक्षता विभागात दहा खाटा तिथेच जन्मलेल्या बालकांसाठी तर दहा बाहेर जन्मलेल्या मात्र प्रकृती गंभीर असलेल्या बालकांकरीत राखीव आहेत. सध्या या रुग्णालयात आजच्या घडीला १५ बालक दाखल झाले आहेत. १४ ते १६ डिसेंबर या कालावधीत एकूण सात शिशू या अति दक्षता विभागात दाखल झाली होती. यात एक मुलीचा व सहा मुलांचा समावेश आहे. यांपैकी एका बालकाला अतिसाराचा त्रास होता, तर एकाचे वजन कमी, एक पूर्णवाढ न झालेले आणि एकाची प्रकृती चिंताजनक होती, असा खुलासा पालिका प्रशासनाने केला आहे. 

मालाड, ओशिवरा, मुलुंड आणि चित्ता कॅम्प येथे जन्मलेल्या या बालकांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना भांडुप प्रसूतिगृहात त्यांच्या पालकांनी दाखल केले होते. वैद्यकीय क्षेत्रानुसार नवजात शिशुच्या मृत्यूचे प्रमाण दहा टक्के असते. या प्रसूतिगृहात हे प्रमाण आधी पाच टक्के होते, या घटनेननंतर ते सात टक्के झाले आहे. बाहेर प्रसूती झालेल्या बालकांमध्ये संसर्गाचा धोका अधिक असल्याने गुंतागुंत वाढते. या बालकांच्या मृत्यूची तारीख व करणे वेगवेगळी आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामृत्यूहॉस्पिटल