भांडुप ड्रीम्स माॅल्स आग : सनराइज रुग्णालयाचे तात्पुरते ताबा प्रमाणपत्र रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:18 AM2021-04-03T08:18:46+5:302021-04-03T08:19:53+5:30
भांडुप पश्चिमेतील ड्रीम्स मॉलमधील सनराइज रुग्णालयाला गेल्यावर्षी महापालिकेने तात्पुरते दिलेले ताबा प्रमाणपत्र (ओसी) अखेर रद्द करण्यात आले.
मुंबई : भांडुप पश्चिमेतील ड्रीम्स मॉलमधील सनराइज रुग्णालयाला गेल्यावर्षी महापालिकेने तात्पुरते दिलेले ताबा प्रमाणपत्र (ओसी) अखेर रद्द करण्यात आले. ओसीमधील अटी रुग्णालयाने पूर्ण केलेल्या नाहीत, असा अहवाल इमारत प्रस्ताव विभागाने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले तर, बुधवारी स्थायी समितीमध्ये तीव्र पडसाद उमटल्यानंतर तातडीने ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सनराइज रुग्णालयात २६ मार्च २०२१ रोजी लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७० रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलविले होते. घटनेची गंभीर दखल घेऊन रुग्णालयास तात्पुरते ताबा प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन आयुक्तांच्या चौकशीची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी स्थायी समितीत केली तसेच इमारत प्रस्ताव विभागाच्या अहवालाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पालिका प्रशासनावरही टीकास्त्र सोडण्यात आले होते.
इमारत प्रस्ताव विभागाने ऑगस्ट २०२० मध्ये पाठविलेल्या अहवालानुसार सनराईज रुग्णालयाला दिलेल्या तात्पुरत्या ताबा प्रमाणपत्रावर फेरविचार करण्याची शिफारस करण्यात आली होती. हा मुद्दा उचलून धरत या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणीही स्थायी समितीमध्ये करण्यात आली होती.
अखेर ताबा प्रमाणपत्र रद्द करत सर्व
त्रुटी दूर करून सर्व अटींचे पालन होईपर्यंत कोणतीही नवीन परवानगी रुग्णालयाला देऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.