भांडुप पोटनिवडणूक : ११ आॅक्टोबर रोजी मतदान, शिवसेना-भाजपात चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:47 AM2017-09-15T06:47:58+5:302017-09-15T06:48:32+5:30
काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुप प्रभाग क्रमांक ११६मध्ये ११ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र प्रमिला पाटील यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे पारडे जड झाले आहे. शिवसेना-भाजपामधील संख्याबळात फारसा फरक नसल्याने या जागेसाठी उभय पक्षांमध्ये चुरस लागली आहे.
मुंबई : काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुप प्रभाग क्रमांक ११६मध्ये ११ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मात्र प्रमिला पाटील यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केल्याने भाजपाचे पारडे जड झाले आहे. शिवसेना-भाजपामधील संख्याबळात फारसा फरक नसल्याने या जागेसाठी उभय पक्षांमध्ये चुरस लागली आहे.
२०१७च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांचा जेमतेम पाचशे मतांच्या फरकाने पराभव केला होता. मात्र प्रमिला पाटील यांचे काही महिन्यांपूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यामुळे या प्रभागातील ही रिक्त जागा भरून काढण्यासाठी ११ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, पाटील यांचा मुलगा कौशिक पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपातून कौशिक यांच्या वहिनी जागृती प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आल्यामुळे प्रत्येक जागा शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरत आहे.
...तर शिवसेनेच्या अडचणी वाढणार
भाजपाने या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यास शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे सेनेनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र शिवसेना आमदार अशोक पाटील यांच्या पत्नीला पुन्हा उमेदवारी देण्यास विभागात विरोध असल्याचे समजते. त्यासाठी शिवसेनेत तगड्या उमेदवाराचाही शोध सुरू आहे. तर ही जागा जिंकण्याची जबाबदारी सेनेने आपल्या नेत्यांवर सोपविली आहे.