भांडुपमध्ये फळीचा तलाव कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 02:05 AM2020-08-22T02:05:20+5:302020-08-22T02:09:50+5:30
मात्र उभारणीच्या दुसऱ्याच दिवशी हा कृत्रिम तलाव कोसळल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
मनीषा म्हात्रे
मुंबई : भांडुपमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मुंबईत पहिल्यांदाच लाकडी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्यात येत असल्याचे सांगून आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा नारळ फुटला. मात्र उभारणीच्या दुसऱ्याच दिवशी हा कृत्रिम तलाव कोसळल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
मुंबईत पालिकेकड़ून १६७ कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. त्यात भांडुपमधील १३ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. मात्र अद्याप कुठलेच काम पूर्ण झालेले नाही. त्यातही कोरगावकर यांनी भांडुपचे सेंटर पॉइंट असलेल्या लालाशेठ कम्पाउंड येथे डांबरी रस्त्यावर, मुंबईत प्रथमच लाकडी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्याचा घाट घातला. थाटात १८ आॅगस्ट रोजी याचा भूमिपूजनाचा शुभारंभही पार पडला. सोशल मीडियावर फोटोही शेअर करण्यात आले. गुरुवारी याचे काम पूर्ण झाले. मात्र शुक्रवारी दुपारीच हा कृत्रिम तलाव कोसळला़ त्यामुळे परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. हा तलाव केंद्रस्थानी असल्याने ६० टक्के भांडुपकरांना याचा फायदा होणार होता. विसर्जनाला ही दुर्घटना घडली असती तर मात्र मोठी हानी झाली असती.
स्थानिक पदाधिकाºयाकडे कामाचा ठेका
या कामाचे कंत्राट सेनेच्या स्थानिक पदाधिकाºयाकडून घेण्यात आले होते. यासाठी चार लाखांचा खर्च केल्याचे समजते. या कामामुळे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
एस वॉर्डला वालीच नाही
पालिकेच्या
एस विभागाच्या साहाय्यक आयुक्तांची दोन दिवसांपूर्वीच बदली झाली आहे. त्यात
नवीन अधिकाºयाने अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत एस वॉर्डला कोणी वालीच नाही. यावर प्रशासन काय भूमिका घेणार, हा प्रश्न भांडुपकर उपस्थित करीत आहेत.
>लाकडी साहित्याच्या नादात आधार विसरले...
तलाव तयार करताना खोल खड्डा खणणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याला आधार मिळाला असता. मात्र, यात डांबरी रस्त्यावर खोदकाम करणे शक्य नाही. वरच्यावर काम केल्यामुळे हा तलाव कोसळला. विसर्जनाच्या दिवशी ही दुर्घटना घडली असती तर मोठी हानी झाली असती, असे माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी सांगितले.