Bhandup Hospital Fire: ...म्हणून महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 02:52 PM2021-03-26T14:52:40+5:302021-03-26T15:31:23+5:30
Bhandup Hospital Fire: सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मुंबई: भांडुपच्या ड्रीम मॉल मधील सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आग प्रकरणी तेथे अनधिकृतपणे कोविड सेंटर उभे राहते याची साधी माहिती सुद्धा महानगरपालिकेला नसल्याचे स्वतः महापौर कबूल करतात. या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच शिवसेनेने या मॉल वर व अनधिकृतपणे उभे राहिलेल्या या सनराईज हॉस्पिटल वर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे काय? असा सवाल करत, या मॉल व हॉस्पिटल च्या संचालक व व्यवस्थापकीय मंडळासोबतच हा मॉल व हॉस्पिटल बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यासाठी ज्यांचा वरदहस्त आहे, त्यांची सुद्धा सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
Bhandup Hospital Fire: ...म्हणून महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त काय?; अतुल भातखळकर यांचा सवाल
डिसेंबर महिन्यात भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घेण्यासाठीची वारंवार मागणी मी स्वतः केली होती. त्यावेळी उघड झालेल्या माहितीत मुंबईमध्ये 1390 रुग्णालये व नर्सिंग होम अनधिकृतपणे सुरू असल्याची व तेथे कोणत्याही प्रकारची आगरोधक सुरक्षा नसल्याचे समोर आले होते.
इतकेच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेकडून फेब्रुवारी महिन्यात करण्यात झालेल्या एका सर्व्हेनुसार 29 मॉलमध्ये अग्नी सुरक्षा व्यवस्था कुचकामी असल्याचे समोर आले होते, आज ज्या ड्रीम मॉलला आग लागली त्याचा सुद्धा या यादीत समावेश होता. या आगीत दुर्दैवी मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची थेट आर्थिक मदत करण्यात यावी व ही रक्कम मॉल व रुग्णालयाकडून वसूल करावी अशी मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे.