मुंबई : भांडुप पश्चिमेतील ड्रीम्स माॅलमधील सनराइज रुग्णालयास गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. तब्बल ३९ तासांहून अधिक काळ धुमसत असलेल्या या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, अर्ध्याहून अधिक मॉल जळून खाक झाला.
रुग्णालयात उपचारादरम्यान २ कोविडबाधितांचा मृत्यू झाला होता, त्यांचेही मृतदेह बाहेर काढल्याची माहिती संबंधित रुग्णालयाद्वारे देण्यात आली. तर जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयांना सूचना देऊन सनराईज रुग्णालयातील कोविड रुग्णांना नेऊन सामावून घेण्यासाठी रुग्णवाहिकांसह आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली.
आगीवर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा आग आटोक्यात आली असली तरी शनिवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत येथे कुलिंग ऑपरेशन सुरू होते. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि मुंबई पोलीस घटनास्थळी कार्यरत होते. दुर्घटनेत अतोनात नुकसान झाले ते व्यापारी, दुकानदारही घटनास्थळी होते.
अग्निशमन दल, मुंबई पोलीस व इतर यंत्रणांच्या सहकार्याने ६८ रुग्णांची सुखरूप सुटका करून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. एस विभागाचे सहायक आयुक्त यांच्यासह वेगवेगळे अभियंता, आरोग्य अधिकारी, इतर कामगार, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही केली. आग विझविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने १ रोबोट, २० मोटरपंप, १५ जम्बो टँकर, ३ वॉटर टँकर, २ उंच शिड्या, १ उंच फिरती शिडी, श्वसन यंत्रणा असलेली ३ वाहने, १ नियंत्रण कक्ष वाहन यासह इतर वाहने व साधनसामग्री तैनात करून आगीवर नियंत्रण मिळवले.
...अन् रुग्णांना गुदमरण्याचा त्रासगुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावर लागलेली आग काही क्षणांत दुसऱ्या मजल्यावरही पोहोचली. त्यातून निघत असलेल्या धुराने तिसऱ्या मजल्यावरील रुग्णालयात कोविड विभाग तसेच अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांना गुदमरण्याचा त्रास झाला. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. आग विझविण्यासह रुग्णांची सुटका करून त्यांना सुरक्षितपणे जवळपासच्या कोविड रुग्णालयांत स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
७८ रुग्ण घेत होते उपचारतळमजला अधिक ३ मजले असलेल्या या मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर सुमारे १०७ बेड असलेले सनराइज रुग्णालय हाेते. दुर्घटना घडली त्या वेळी येथे ७८ रुग्ण उपचार घेत होते. आगीच्या धुरामुळे गुदमरलेल्या काेराेना रूग्णांना इतर रूग्णालयात दाखल करण्यात आले.
उपायुक्त प्रभात रहांगदळे करणार आगीची चाैकशीभांडुप पश्चिमेतील ड्रीम्स मॉल व तेथील तिसऱ्या मजल्यावरील सनराइज रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे यांची नियुक्ती केली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्याची मुदत त्यांना देण्यात आली आहे.
सनराइज रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर येथील अनियमितता पुढे आली. रुग्णालय सक्षम नसताना कोविड रुग्णांवर उपचाराची परवानगी कशी देण्यात आली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी भाजपकडून करण्यात येत होती. त्यानुसार घटनेची, आगीच्या कारणांबाबत सर्वंकष चौकशी उपायुक्त रहांगदळे करणार आहेत.
चौकशीचे मुद्दे
- आगीचे नेमके कारण काय? त्याबाबत प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांसाेबत सल्लामसलत करून कारणांची स्पष्टता करणे.
- मॉल, सनराइज रुग्णालयाला आवश्यक परवानगी/परवाने दिले होते का? याची पडताळणी करून, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे.
- अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यात मॉलचे मालक - व्यवस्थापन तसेच रुग्णालयाचे मालक - व्यवस्थापन यांनी काही त्रुटी ठेवली का? हे शोधून काढणे.
- अग्निशमन कार्यात काही त्रुटी होत्या का? त्याची कारणे शोधून काढणे तसेच इतर काही संदर्भित मुद्दे असल्यास ते आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिफारशी सुचवणे.