Join us

वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:07 AM

माेबाइल, डायरीतून खुलासा; ३२ क्लब, बारसह लाॅजेसची नावे उघडकीसलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत ...

माेबाइल, डायरीतून खुलासा; ३२ क्लब, बारसह लाॅजेसची नावे उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती. या परिसरातील ३२ बार व क्लबमधून तो गेल्या सात महिन्यांपासून वसुली करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

शिंदेच्या मोबाइलमध्ये आणि त्याच्या घरी सापडलेल्या डायरीत हफ्ता वसुली करणाऱ्या ठिकाणांची यादी मिळाली आहे. ३२ क्लब, बार व लॉजेसची नावे त्यामध्ये असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

एनआयएच्या अटकेत असलेल्या वाझेने शिंदे व क्रिकेट बुकी नरेश गोरच्या साथीने मनसुख हिरेनची हत्या केल्याचे पुरावे सापडले आहेत. लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणात शिक्षा झालेला बडतर्फ कॉन्स्टेबल शिंदे गेल्यावर्षी मे महिन्यापासून पेरॉलवर बाहेर होता. वाझेच्या संपर्कात राहून त्याने वाझेकडून हप्ता वसुलीचे काम मिळविले होते. दर महिन्याला लाखो रुपये घेऊन तो वाझेला पोहोचवित होता, त्याबदल्यात त्याला कमिशन मिळत असे, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे.