Join us

भांडुपचा ‘ऑक्सिमॅन’ स्वतःची एफडी मोडून पुरवतोय श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:07 AM

मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या संकटात अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. मध्यंतरी राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा ...

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संकटात अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. मध्यंतरी राज्यात सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत होते. अशावेळी भांडुपकर असलेल्या विशाल कडणे याने आपल्या डॉक्टर ऑफ लिटरेचर शिक्षणासाठी ठेवलेली एफडी मोडून गरजूंना ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर मशीन उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन घडविले. सध्या भांडुपचा ऑक्सिमॅन म्हणून विशालची ओळख बनली आहे. त्याच्या या प्रयत्नांमुळे आतापर्यंत १२ हून अधिक कोरोनाबाधितांचे प्राण वाचले आहेत.

भांडुपचा रहिवासी असलेला विशाल हा मुंबई हाऊसिंग फेडरेशनमध्ये संचालकपदी कार्यरत आहे. सुरुवातीपासूनच समाजसेवेचे वेड असलेल्या विशालने कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मोफत पाच हजार मास्क, ५०० ऑक्सिमीटर, अन्नधान्य अशा अनेक जीवनोपयोगी वस्तू गरजूंना पुरविल्या. आजही त्याची ही जनसेवा सुरू आहे.

दुसऱ्या लाटेत सुरुवातीच्या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अशावेळी विशालने ऑक्सिजनच्या कमतरतेवर एक उपाय म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर मागविण्याचे ठरविले. या यंत्रामुळे ऑक्सिजन बेडच्या कमतरतेला एक पर्याय उपलब्ध होत आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. ऑक्सिजन सिलिंडरला एक सर्वोत्तम पर्याय म्हणून हे यंत्र घरी वापरता येऊ शकते. त्यामुळे सौम्य लक्षणांच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड अडवून ठेवावे लागणार नाहीत आणि गंभीर रुग्णांना हे बेड मिळू शकतील असे कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून समजताच विशालने अनेक परदेशी कंपन्यांसोबत चर्चा करून काही ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटरची मागणी केली.

मात्र, या मशीन महाग असल्याने विशालने आपल्या शिक्षणासाठी ठेवलेल्या एफडी मोडून या मशीन खरेदी केल्या. विशालला डॉक्टर ऑफ लिटरेचरची पदवी घ्यायची आहे. कोरोनामुळे शिक्षण थांबले. अशात, विशालने शिक्षणासाठी जपून ठेवलेल्या रकमेतून आतापर्यंत एकूण १२ मशीन खरेदी केल्या असून, त्या गरजू रुग्णापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. मुंबईसह नवी मुंबईमध्ये आतापर्यंत या मशीनची सेवा पुरविण्यात आली आहे. आजही दिवसभर स्वतःचे काम उरकून विशाल गरजू लोकांपर्यंत मोफत सेवा पुरवित आहे.

* प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा

सध्याची परिस्थिती खूपच बिकट आहे. अशा परिस्थितीत आपण एकमेकांना मदतीचा हात पुढे केला तरच कोरोनाच्या अशा महाभयंकर परिस्थितीशी सामना करू शकतो. माझ्याप्रमाणेच इतरांनीदेखील खारीचा वाटा उचलून सामाजिकतेचे भान जोपासावे, असे आवाहनही विशालने केले आहे.

* दादा घरातले धान्य संपले

कोरोना काळात सुरू असलेल्या अविरत सेवेमुळे विशालला कुणा ना कुणाचे तरी हक्काने कॉल येतात. मंगळवारीही अशाच प्रकारे एकाने कॉल करून दादा घरातले धान्य संपल्याचे विशालला सांगण्यात आले. विशालने तत्काळ त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविली.

....................................