Join us

भांडुपचा ऑक्सिमॅन विशाल कडणेचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:06 AM

मुंबई : ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत असताना भांडुपकर असलेल्या विशाल कडणे याने आपल्या डॉक्टर ऑफ लिटरेचर शिक्षणासाठी ठेवलेली एफडी मोडून ...

मुंबई : ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावत असताना भांडुपकर असलेल्या विशाल कडणे याने आपल्या डॉक्टर ऑफ लिटरेचर शिक्षणासाठी ठेवलेली एफडी मोडून गरजूंना ऑक्सिजन काॅन्सट्रेटर मशीन उपलब्ध करून देत माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले होते. भांडुपच्या या ऑक्सिमॅन म्हणून ओळख असणाऱ्या विशालचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून सन्मान करण्यात आला आहे.

त्याच्या या प्रयत्नांमुळे आतापर्यंत १०० हून अधिक कोरोनाबाधितांचे प्राण वाचले आहेत. त्याच्या याच निस्वार्थी कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली. लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे युरोपचे प्रमुख विल्हेम जेझलर यांनी विशाल कडणे याला सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रमाणपत्र देऊन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे त्याच्या कार्याचा सन्मान केला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेला विशाल कडणे हा वयाने सर्वात तरुण ठरला आहे. लंडन येथील विम्ब्लये ब्रेंट महापालिकेचे महापौर भगवानजी चोहान यांनी फोन करून विशालचे अभिनंदन केले.

शिक्षणाने सिव्हिल इंजिनीअर असलेला विशाल गेले १ वर्ष सातत्याने कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. विशालने मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा, कराड, विटा इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने या मशीन पोहोचविल्या आहेत. या कामात विशालचे आईवडील जयश्री व विजय कडणे यांचीदेखील मदत व प्रेरणा मिळत असल्याचे त्याने सांगितले. त्याचे सहकारी डॉ. प्रमोद जाधव, वैभव भुर्के, गौरव पोतदार, चेतन वैद्य, पंकज चावरे व इतर सर्वांची मोलाची मदत होत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या कार्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फेसबुक लाइव्ह करून कौतुक केले होते. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन कोरोनाचा सामना करायला हवा असे विशालचे म्हणणे आहे.