भांडुपचे सनराईज रुग्णालय पुन्हा सुरू करता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:06 AM2021-04-28T04:06:23+5:302021-04-28T04:06:23+5:30
ड्रीम्स माॅल आग प्रकरण; उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा देण्यास नकार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आग लागून ११जण मृत्यू ...
ड्रीम्स माॅल आग प्रकरण; उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा देण्यास नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आग लागून ११जण मृत्यू पावलेले भांडुप येथील सनराईज रुग्णालय पुन्हा सुरू करण्यास नकार देत उच्च न्यायालयाने हॉस्पिटलला अंतरिम दिलासा देण्यास मंगळवारी नकार दिला.
भांडुप पश्चिमेतील ड्रीम्स मॉलला २५ मार्च रोजी आग लागली. यात माॅलमधील सनराईज हॉस्पिटलमधील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने हॉस्पिटलचे तात्पुरते व्यवसाय प्रमाणपत्र मागे घेतले. पालिकेच्या या निर्णयाला आव्हान देऊन व पुन्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी सनराईज रुग्णालयाचे मालक प्रीव्हिलेज हेल्थकेअर सर्व्हिसेस लि.ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, ‘आम्ही रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासंदर्भात अंतरिम आदेश देणार नाही. ते प्रतीक्षा करू शकतात’, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
याचिकेनुसार, हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी २५० खाटा उपलब्ध आहेत आणि ऑक्सिजनही आहे. मात्र, मुंबई पालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी या याचिकेवर आक्षेप घेतला. ‘२५ मार्चच्या दुर्घटनेनंतर पालिकेने हॉस्पिटलला अग्निशमन दलाने दिलेले ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र आणि नर्सिंग परवाना रद्द केला. संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठाही खंडित केला आहे. पोलिसांनी ही इमारत सील केली तसेच मॉलच्या मालकाविरुद्ध व याचिकाकर्त्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे’, अशी माहिती साखरे यांनी न्यायालयाला दिली.
* ११ जणांचा मृत्यू आगीमुळेच!
त्यावर याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, सुरुवातीला आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली हाेती. रुग्णालयाला आग लागली नाही. ११ रुग्णांचा मृत्यू आगीच्या धुरामुळे गुदमरून झाला. आगीमुळे झाला नाही. मात्र, त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावत ११ लोकांचा मृत्यू आगीमुळे झाला, असे नमूद करुन उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी जूनमध्ये ठेवली.
----------------------