भांडुपमध्ये ‘दृश्यम’ हत्याकांड?
By admin | Published: September 13, 2015 02:48 AM2015-09-13T02:48:28+5:302015-09-13T02:48:28+5:30
नुकत्याच प्रदर्शित झालेला ‘दृष्यम’ हा हिंदी चित्रपट बघून आलेल्या कुटुंबीयांनी ३० वर्षीय विवाहितेची हत्या करून मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये फेकला. आदल्या दिवशी हत्या
- मनीषा म्हात्रे, मुंबई
नुकत्याच प्रदर्शित झालेला ‘दृष्यम’ हा हिंदी चित्रपट बघून आलेल्या कुटुंबीयांनी ३० वर्षीय विवाहितेची हत्या करून मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये फेकला. आदल्या दिवशी हत्या केल्यानंतर चित्रपटाच्या कथेप्रमाणे आपले मोबाइल बंद केले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी नातेवाईकांकडे पोहचले असतानाही आदल्या दिवसापासून कार्यक्रमात असल्याचा बनाव केला. मात्र तपासामध्ये आधीच्या दिवशी सर्वांचेच शेवटचे लोकेशन घरचेच होते. या रहस्यमय हत्याकांडप्रकरणी तांत्रिक पुराव्याच्या आधारे भांडूप पोलिसांनी सासू व नणंदेला हत्येच्या गुन्ह्यात अटक करून यातील मुख्यसूत्रधार पतीचा शोध सुरु केला आहे.
एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,भांडूपच्या प्रताप रोड नगरात भारती चव्हाण ही पती किरण, दोन मुले, सासू रतन, नणंद उषा सोलंकी यांच्यासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी किरणने दृश्यम हा चित्रपट पाहिला होता.
९ सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या हत्येनंतर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे पुरावे नष्ट केले. भारतीचा मृतदेह घरातील पाण्याच्या पिंपात टाकला. त्यानंतर मोबाइल लोकेशन सापडू नये म्हणून सासरच्यांनी भांडूपमध्येच मोबाइल बंद केल्याचा संशय आहे, असे या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की, माझगाव येथील नातेवाईकाच्या घरी ८ तारखेला कार्यक्रम असताना ही मंडळी कार्यक्रमात असल्याचे भासविण्यासाठी हत्येच्या मध्यरात्रीच नातेवाइकांच्या घरी पोहचले होत़े दुसऱ्या दिवशी १० तारखेला घरी परतल्यानंतर या कुटुंबीयांनी अनोळखी मारेकऱ्यांनी भारतीची हत्या केल्याचे सर्वांना सांगितले.
या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी महेश पाटणकर आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे नितीन गिजे याचा अधिक तपास करत आहेत. पती किरण पसार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी त्याचा मोबाइल टॉवर लोकेशन तपासण्यासाठी सीडीआर काढला किरणसह त्याच्या कुटुंबियांचे मोबाईल लोकेशन भांडुपमध्येच बंद झाले होते. चौकशीदरम्यान, त्यात चित्रपटाप्रमाणे कुटुंबातील सगळी मंडळी सारखी उत्तरे देत होती़ त्यामुळे पोलीसही चक्रावले. मुलाबाबत विचारणा केली असता तो आदल्या दिवशीच कामावर गेल्याचे भासवले. मात्र या प्रकरणी माझगाव येथील नातेवाइकाकडे केलेल्या चौकशीत तेथील एका व्यक्तीने चव्हाण कुटुंबीय कार्यक्रमाच्या दिवशी आले नव्हते़ पण ते दुसऱ्या दिवशी आल्याचे सांगीतले. चौकशीत विसंगती आढळल्याने अखेर पोलिसांनी सासू आणि नणंदेला अटक करून तपास सुरु केला आहे. किरणचा सध्याचा टॉवर लोकेशन गुजरात दाखवत आहे. मुंबईतील नातेवाईकांकडे अधिक तपास सुरु असल्याची माहिती भांडूप पोलिसांनी दिली.
मध्यरात्री पोहोचले नातेवाइकाच्या घरी
माझगाव येथील नातेवाईकाच्या घरी ८ तारखेला कार्यक्रम असताना ही मंडळी कार्यक्रमात असल्याचे भासविण्यासाठी हत्येच्या मध्यरात्रीच नातेवाइकांच्या घरी पोहचले होत़े मात्र त्यांनी आदल्या दिवशीच कार्यक्रमाला आलो असल्याचे सर्वांनाच सांगून ठेवले होते.