भानू दाम्पत्यच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार; न्यू इंडिया बँकेच्या ६ संचालकांचा जबाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 06:13 IST2025-03-04T06:11:24+5:302025-03-04T06:13:59+5:30
बँकेचा माजी अध्यक्ष असलेला हिरेन भानू अबुधाबीला गेल्याचे स्पष्ट झाले होते, तर त्यापाठोपाठ संचालक असलेली गौरी भानू थायलंडला पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

भानू दाम्पत्यच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार; न्यू इंडिया बँकेच्या ६ संचालकांचा जबाब
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या संचालक मंडळातील सर्वांना समन्स बजावत चौकशीला बोलावले. त्यांपैकी गौरी भानू फरार आहे, तर अन्य सहा संचालकांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या घोटाळ्यामध्ये भानू दाम्पत्य मुख्य सूत्रधार असल्याचा दावा संचालकांनी केला आहे. दुसरीकडे, हे दाम्पत्य थायलंड, अबुधाबीला गेल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्यासह चार जणांविरुद्ध एलओसी जारी करण्यात आली आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या १२२ कोटींच्या घोटाळ्यातील २८ कोटी भानू दाम्पत्याला मिळाले होते. यामध्ये बराचसा पैसा त्यांच्या विविध कंपन्यांमध्ये फिरला आहे. यापैकी काही कंपन्यांना हे पैसे पाठवल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासात २६ जानेवारीला बँकेचा माजी अध्यक्ष असलेला हिरेन भानू अबुधाबीला गेल्याचे स्पष्ट झाले होते, तर त्यापाठोपाठ १० फेब्रुवारीला माजी उपाध्यक्ष, तसेच संचालक असलेली गौरी भानू थायलंडला पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या दोघांसह पसार आरोपी उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई विरुद्ध ‘लूकआउट सर्क्युलर’ (एलओसी) जारी करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या एकूण ७ संचालकांपैकी सहा जणांना समन्स बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. यामध्ये संचालक फेड्रिक डिसुझा, कुरुष पगडीवाला, मिलन कोठारी, शिव कथुरिया, विरेन बरोट, विनीत उपाध्याय हे चौकशीला हजर झाले. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. सहाही जणांनी भानू दाम्पत्याकडे बोट दाखवत तेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. दोघेच सर्व कारभार बघत होते. तेच सर्व निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार तपास पथक अधिक चौकशी करत आहे.
बँकेचे ऑडिट करणाऱ्याचेही जबाब नोंदवून घेणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात काय समोर आले, याबाबतची माहितीही मागवण्यात आली आहे.
‘तो’ कंत्राटदारही आरोपी
बँक महाव्यवस्थापक हितेश मेहताकडून दहा कोटी घेतलेल्या कंत्राटदारालाही आरोपी करण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध एलओसी जारी करण्यात आली आहे. तो मेहताच्या दहीसरच्या इमारतीत राहण्यास आहे.
मनोहर सहकार्य करत नाही
अरुण भाईचा शोध सुरू असून, अटकेत असलेला त्याचा मुलगा मनोहर तपासाला सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
फॉरेन्सिकला पत्र
मेहताच्या लाय डिटेक्टर टेस्टसाठी फॉरेन्सिक विभागालाही आर्थिक गुन्हे शाखेने पत्र पाठवून वेळ मागितली आहे.