मुंबई : फोर्ट येथे भानुशाली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सर्वांना आपले घर तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता महिनाभराने का होईना येथील रहिवाशांना किमान घराबाबत तरी न्याय मिळाल्याची भावना असून, यातील २१ कुटूंबांना ताडदेव चिखलवाडी येथील पुनर्विकास इमारतीमध्ये घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. तर उर्वरित रहिवाशांनी स्वत:च्या वास्तव्याची व्यवस्था स्वत: केली आहे.
भानुशाली ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता. या तळमजली अधिक सहा मजली म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतीच्या एका बाजुचा भाग कोसळला होता. म्हाडाकडील माहितीनुसार, ही इमारत १०० वर्षे जुनी होती. इमारतीस दुरुस्तीची आवश्यकता असल्याने मालक, रहिवाशांच्या मागणीनुसार इमारतीतील सहा भाडेकरु, रहिवाशांना इमारतीच्या दुरुस्तीकरीता ना-हरकत प्रमाणपत्र (विना परताव्यासह) देण्यात आले होते. या तरतुदीनुसार मालक आणि भाडेकरु स्वखर्चाने इमारतीची दुरुस्ती करु शकतात. त्याचबरोबर ना-हरकत प्रमाणपत्रासोबत म्हाडाने रहिवाशांच्या सुरक्षेबाबतचे हमीपत्र देखील घेतले होते. ना-हरकत प्रमाणपत्र देते वेळी इमारतीत एकूण २७ निवासी व ३१ अनिवासी गाळे होते. त्यानंतर महापालिकेकडून इमारतीच्या दुरुस्तीकरीता आयओडी व सीसी जून २०१९ मध्ये प्राप्त केली. ना-हरकत प्रमाणपत्रधारकांना इमारतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली आयओडी, नकाशे पालिकेमार्फत २ जून २०१८ रोजीच प्रदान करण्यात आले होते. शिवाय त्यानंतर इमारत दुरुस्तीचे काम सुरु करण्याकरीता आवश्यक असणारा परवाना १ जून २०१९ रोजी महापालिकेमार्फत देण्यात आला होता.
नव्या इमारतीचे काम लवकरचभानुशालीमध्ये एकूण ४५ कुटूंबे आहेत. यापैकी २१ कुटूंबांना चाव्या देण्यात आल्या आहेत. ताडदेव येथील चिखलवाडीमधल्या पुनर्विकास इमारतीमध्ये २१ कुटूंबांना घरे देण्यात आली आहेत. आता म्हाडा, महापालिका यांच्याकडून येथील बांधकामांना आवश्यक सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. येथे लवकरच नव्या इमारतीचे बांधकाम सुरु होईल. उर्वरित कुटूंबांनी आपल्या वास्तव्याची व्यवस्था स्वत: केली आहे.- विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, म्हाडा