मुंबई : सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी असली तरी त्याचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महानगर प्रदेशाकरिता भरारी पथकांची स्थापना केली आहे. भरारी पथकामध्ये संबंधित महापालिकेतील प्रतिनिधी व स्थानिक पोलिस विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. ही पथके कारवाई करत त्याचा अहवाल प्रत्येक आठवडयाला मंडळाला सादर करणार आहेत.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सिंगल युज प्लास्टिकचा होत असलेला वापर थांबवण्यासाठी अंमजबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. यावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, डोबिंवली, उल्हासनगर, भिवंडी - निजामपूर, नवी मुंबई व पनवेल या महापालिका हद्दीत व बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत पथके कारवाई करणार आहेत. सिंगल युज प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी पथकामार्फत सिंगल युज प्लास्टिकची साठवणूक, वितरण करणाऱ्या आस्थापनांवर व त्याचबरोबर विघटनशील प्लास्टिकच्या नावाखाली सिंगल युज प्लास्टिकचे वितरण करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार आहे.