मुंबई : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या या बंद आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, शिवसेनेने या बंदला पाठिंबा दिला नसला तरी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन ‘सामना’तून सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एकत्र पाहायला मिळाले. निमित्त होते ते, पोस्टल स्टॅम्पचे प्रकाशन.
भारतीय पोस्ट विभागातर्फे सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते या स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह सर्व विश्वस्त, प्रधान सचिव आणि महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल उपस्थित होते.
दरम्यान, भारतीय पोस्ट विभागातर्फे ‘माय स्टॅम्प’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, मित्राचा, नातेवाईकांचा फोटो सिद्धिविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
(Bharat Bandh Live Updates: 'भारत बंद'ला सुरुवात; देशभरात काँग्रेसची निदर्शनं)
'बंद यशस्वी करा'दरम्यान, शांततामय मार्गाने बंद यशस्वी करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
(Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे)