मुंबई - देशभरात बंदला चांगला प्रतिसाद असून लोकं उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभागी आहेत. सरकारने मनं मोठं करून विचार केल्यास, आंदोलनामुळे तणावाखाली येण्याची सरकारला गरज नाही. कारण, कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची व्यथा ऐकायलाच हवी, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी आजचं बोलावं, गेल्या 10 वर्षांपूर्वीचं बोलू नये. आपण काय बोलतोय, याचा 10 वेळा विचार करावा, असा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.
बाजार समित्यांची मक्तेदारी संपवून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे समर्थन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच केले. आघाडी सरकारच्या काळातच त्यासाठीचे कायदेही झाले. आता त्यांच्याकडून होत असलेला विरोध हा निव्वळ दुटप्पीपणा असून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली होती. त्यात, शिवसेनेच्या भूमिकेवरही फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता, आजचं बोला असे म्हणत त्यांनी फडणवीसांनाच टोला लगावला.
''गेल्या 10 ते 12 दिवसांपासून शेतकरी थंडी वाऱ्याच्या पर्वा न करता, सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमारेषेवर संघर्ष करतोय त्याला पाठिंबा देणं हे देशातीलच नाही, तर जगातील नागरिकांचं कर्तव्य आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जगातील अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. सरकारने मनं मोठं करून विचार केल्यास, आंदोलनामुळे तणावाखाली येण्याची सरकारला गरज नाही. कारण, कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची व्यथा ऐकायलाच हवी, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देशभरात बंदला चांगला प्रतिसाद असून लोकं उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभागी आहेत,'' असेही राऊत यांनी म्हटलं.
''उत्खनन करायचं म्हटलं की हे लांबपर्यंत जाईल, तुम्ही 10 वर्षापूर्वीचं बोलू नका, आज काय चाललंय ते पाहा. शेतकरी आज रस्त्यावर आहे. आजचा बंद ना शिवसेनेनं पुकारला, ना राष्ट्रवादीने, ना तृणमूल काँग्रेसने आवाहन केलंय. जो शेतकरी रस्त्यावर उतरलाय, त्यास कुठलंही राजकीय पाठबळ नाही, हे राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी समजावून घेतलं पाहिजे. शेतकऱ्याच्या हातात कुठलाही राजकीय झेंडा नाही, आपण विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमिका मांडतोय याचा फडणवीसांनी 10 वेळा विचार करायला हवा,'' असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच, शेतकरी आज स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यासाठी तयार का झालाय, यासंदर्भात शांत डोक्याने विचार केला, राजकीय अभिनवेश बाजूला ठेवला, तर देवेंद्र फडणवीस हेही शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहतील, असेही राऊत यांनी म्हटलंय.
फडणवीसांची पवारांच्या भूमिकेवर टीका
शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना बाजारपेठांमध्ये खासगी गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करणारे आणि मॉडेल बाजार समिती कायद्याची गरज प्रतिपादित करणारे पत्र त्यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. एवढेच नव्हे तर पवार यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांनी, शेतकऱ्याला आपला माल कुठेही विकता यावा, बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढायला हवी. शेतीमाल बाजार समितीतच विकण्याचे बंधन नसावे असे मत व्यक्त केलेले आहे.