मुंबई - काँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद'मध्ये शिवसेनेनं सहभागी होऊ नये, यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. 'मुंबई मिरर'ने यासंबंधी वृत्त दिले आहे. मात्र अमित शहा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भारत बंदसंदर्भात कोणताही फोन आला नसल्याचे सांगत शिवसेनेकडून हे वृत्त फेटाळून लावण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणाचाही फोन आला नव्हता. उद्धव ठाकरेंनी विचारपूर्वक भारत बंदला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
लासबागमध्ये बसची तोडफोड
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. देशभरात ठिकठिकाणी सत्ताधारी भाजपाविरोधात आंदोलकांकडून निदर्शनं सुरू करण्यात आली आहेत. या बंदला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे, सत्तेत सहभागी असूनही नेहमी विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेनं मात्र बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला शिवसेनेनं पाठिंबा का दर्शवला नाही,असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही!
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे शिवसेना बॅकफुटवर गेल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊ नका, अशी विनंती करणारा फोन अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपा नेत्यांनी विनंती केल्यानंतर शिवसेना बॅकफुटवर गेल्याचे म्हटले जात आहे.
(Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे)
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपासहीत विरोधकांवर निशाणा साधला आहे. ''भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? आम्हाला महागाईत होरपळणार्या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत? जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
(दिल्लीश्वरांची कानठळी बसेल असा कडकडीत बंद पाळा - राज ठाकरे)
बंदला केवळ पाठिंबाच नव्हे; तर सक्रिय सहभाग राहणार असल्याचे सांगत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीश्वरांनी काय काय चुका करून ठेवल्यात, याचा हिशोब त्यांच्या कानठळी नीटपणे पोहोचेल इतका कडकडीत बंद पाळा, असे आवाहन करीत मोदी सरकार व भाजपावर प्रहार केला आहे. नोटाबंदीसारख्या चुकीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात आल्याने ती सावरण्यासाठी भरमसाट कर लादण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.