मुंबई : संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेस, राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे, तर शिवसेनेशी संबंधित विविध संघटनांनी आजच्या बंदमध्ये सक्रिय सहभागाची घोषणा केली आहे. या भारत बंदला देशातील प्रमुख १९ पक्षांनी, कामगार संघटना कृती समिती, किसान संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईमध्ये अंधेरी पश्चिमेला तसेच सायन येथील राणी लक्ष्मीबाई चौक आणि गोरेगाव पश्चिमेला निदर्शने करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द करावेत, एमएसपीचा कायदा करावा, २०२० चा वीज कायदा रद्द करावा, कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, डिझेल, पेट्रोलसह घरगुती गॅस दरवाढ मागे घ्यावी, महागाईला आळा घालावा, नवी शिक्षण नीती हाणून पाडा आदी आमच्या मागण्या आहेत, असे सांगून अधिकाधिक लोकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.