Join us

भरत गोगावले हा बोगस, खरे प्रतोद सुनील प्रभू; आमदार सुनील राऊतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 1:21 PM

भरत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली निवड सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे.

मुंबई: सोमवारी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, शिवसेनेप्रमाणेच या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या व्हीपचाही प्रश्न निर्माण होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे व्हीप जितेंद्र आव्हाड आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाचे व्हीप म्हणून अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल पाटील यांनी व्हीप बजावणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे व्हीप कुणाचा हा वाद आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर येणार आहे. 

भरत गोगावले यांची व्हीप म्हणून झालेली निवड सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला त्यांची नव्याने निवड करावी लागणार आहे. त्यांची निवड झाल्यानंतरही त्यांचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होईल का, हा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे सचिव अनिल परब यांना केला असता, न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला त्यांचा व्हीप लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांचेही व्हीप स्वतंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधासभेतील व्हिपवरुन ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही झालं तरी सुनील प्रभू यांचा व्हीप सगळ्यांना मानावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, भरत गोगावले हा बोगस प्रतोद आहे, खरे प्रतोद सुनील प्रभू आहेत, अशी टीका करत विधान परिषदेत देखील त्यांचाच व्हीप असेल, असा दावा सुनील राऊत यांनी केला आहे.  

विधान परिषदेतही व्हीपचा प्रश्न

मागील अधिवेशनातही पक्षप्रतोद नेमण्यात आले होते. मागील अधिवेशनात राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून एकनाथ खडसे यांची निवड करण्यात आली होती. प्रतोदपदी अनिकेत तटकरे यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता इथेही एक गट सत्तेत आणि विरोधात असल्याने दोन गटांचे दोन वेगळे प्रताेद नेमले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :सुनील राऊतमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस