मुंबई : भारत पेट्रोलियम आणि पश्चिम रेल्वे या बलाढ्य संघांनी आपापल्या सामन्यात निर्णायक बाजी मारताना नुकताच बाल उत्कर्ष मंडळच्या वतीने पार पडलेल्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले. लालबाग येथील गणेश गल्ली मैदानात झालेल्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलियम संघाने चुरशीच्या सामन्यात देना बँकेचे कडवे आव्हान १५ - ५ असे परतावून विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्या सत्रात युनियन बँकेने वर्चस्व राखताना सतीश खांबे, मयूर खामकर यांच्या जोरावर मध्यंतराला ५-३ अशी आघाडी मिळवली होती. मात्र यानंतर भारत पेट्रोलियमने वेग वाढवताना सामना पूर्णपणे पलटवला. आंतरराष्ट्रीय खेळाडू नितीन मदने आणि राष्ट्रीय खेळाडू रिशांक देवाडिगा या अव्वल खेळाडूंनी आपला हिसका दाखवताना बँकेला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. या दोघांच्या आक्रमक खेळाला निलेश शिंदेने देखील उपयुक्त साथ देताना दमदार पकडी करून बँकेला रोखून धरले. दखल घेण्याची बाब म्हणजे पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवल्यानंतर बँकेला दुसऱ्या सत्रात एकही गुण मिळवता आला नाही.दुसऱ्या बाजूला महिला गटात बलाढ्य पश्चिम रेल्वेने उत्कृष्ट सांघिक खेळ करताना देना बँकेला २८-२१ अशी धडक देत विजेतेपदावर नाव कोरले. मध्यंतरालाच रेल्वेने १२-५ अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. पूजा केणी, नेहा घाडगे आणि रिची राणी यांचा चतुरस्र खेळ रेल्वेच्या विजेतेपदामध्ये निर्णायक ठरला. तसेच अपेक्षा टाकळे, रेखा सावंत यांचा झुंजार खेळ बँकेचा पराभव टाळू शकला नाही. (क्रीडा प्रतिनिधी)वैयक्तिक विजेते :सर्वोत्कृष्ट खेळाडू :पुरुष : रिशांक देवाडिगा (भारत पेट्रोलियम)महिला : पूजा केणी (पश्चिम रेल्वे)सर्वोत्कृष्ट आक्रमक :पुरुष : अजिंक्य कापरे (युनियन बँक)महिला : अपेक्षा टाकळे (देना बँक)सर्वोत्कृष्ट संरक्षक :पुरुष : निलेश शिंदे (भारत पेट्रोलियम)महिला : रिची राणी (पश्चिम रेल्वे)
भारत पेट्रोलियमचे वर्चस्व
By admin | Published: April 17, 2015 12:22 AM