Join us

भारत रंग महोत्सवातून जगभरातील नाट्यपरंपरा उलगडणार

By स्नेहा मोरे | Published: January 31, 2024 7:21 PM

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे आयोजन, १५ शहरांमध्ये १५० कार्यक्रम

मुंबई - नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थेने मुंबईत २५ वा भारत रंग महोत्सव आयोजित केला आहे. या नाट्य महोत्सवादरम्यान २१ दिवसांमध्ये देशातल्या १५ शहरांमध्ये १५० हून अधिक सादरीकरण आणि असंख्य कार्यशाळा, चर्चा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणारे मास्टर क्लासेस आयोजित करण्यात आले आहेत. १ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी आयोजित महोत्सवात भारतीय - जागतिक नाट्य परंपरांचे समृद्ध विविध पैलू अधोरेखित करेल.

मुंबईसह हा महोसत्व, पुणे, भुज, विजयवाडा, जोधपूर, दिब्रुगढ, भुवनेश्वर, पाटणा, रामनगर आणि श्रीनगरमध्ये एकाचवेळी होणार आहे. महोत्सवाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी, एनएसडी सोसायटीचे अध्यक्ष परेश रावल यांनी यासंदर्भात माहिती दिली. या पत्रकार परिषदेला महोत्सवाचे सदिच्छादूत पंकज त्रिपाठी,मुक्ती फाउंडेशनच्या संस्थापक - अध्यक्ष स्मिता ठाकरे, श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत उपस्थित होते.

यंदाचा महोत्सव ‘वसुधैव कुटुंबकम, वंदे भारंगम’: सामाजिक समरसतेसाठी काम करणाऱ्या जगभरातील कलाकार आणि नाट्यकर्मी यांच्या एकतेचा सोहळा आणि त्यांच्या कार्याला सलाम', या संकल्पनेवर आधारित आहे. हा महोत्सव नेहमीच्या प्रेक्षकांच्या पलीकडे, सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, असे अभिनेता पंकज त्रिपाठी यावेळी म्हणाले.

सरकारने जास्तीत जास्त सांस्कृतिक केंद्र उभी राहतील आणि त्यांची जोपासनाही केली जाईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे - परेश रावल, अध्यक्ष, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा

मुंबईत इथे होतील कार्यक्रम, या दर्जेदार नाटकांची पर्वणी

मुक्ती सांस्कृतिक केंद्र या महोत्सवा अंतर्गत ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करणार आहे. १ ते ३ फेब्रुवारी या काळात हा महोत्सव दादर मधील शिवाजी मंदिर नाट्यगृह इथे तर ४ ते ६ फेब्रुवारी या दरम्यान अंधेरी पश्चिम येथील मुक्ती कल्चरल हब इथे नाटके सादर होणार आहेत. ६ फेब्रुवारी रोजी मुक्ती सांस्कृतिक केंद्र इथे सांगता होणार आहे. या सहा दिवसांत, विविध शैली आणि भाषांमधील सर्वोत्कृष्ट ठरलेली एकूण सहा नाटके दाखवली जातील. एनएसडीच्याच एका नाट्य समूहाची निर्मिती असलेल्या, “ताजमहल का टेंडर’ या नाटकाने, या महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर, रंगपीठ थिएटर, मुंबईचे 'गजब तिची अदा ', एनएसडी रेपर्टरी कंपनी, नवी दिल्ली द्वारे ‘बाबूजी’, पंचकोसी, दिल्ली चे ‘द झू स्टोरी’, थिएटर फ्लेमिंगो, गोवा चे ‘तोडी मिल फॅन्टसी’ आणि दर्पण, लखनौ ची ‘स्वाह’ अशा विविध नाट्यकृती यावेळी सादर होणार आहेत. १ फेब्रुवारी २०२४ रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे भारत रंग महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि एनएसडीचे अध्यक्ष परेश रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.