- संजय कांबळे, बिर्लागेटभारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या मालकीच्या साडेतेवीस एकर जमिनीतून रेतीउपसा झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. कल्याण तालुक्यातील आपटी चोण गावातील उल्हास नदीकिनारी असलेल्या या भूखंडाला रेतीमाफियांच्या उपद्रवातून लतादिदींचीही सुटका नाही, हे कटू वास्तव अनुभवास आले आहे.उल्हास नदीच्या किनारी काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनी ही जमीन खरेदी केली. चार वर्षांपूर्वी या जागेची मोजणी झाली होती. त्या वेळी उषा मंगेशकर उपस्थित होत्या. जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर लता दीनानाथ मंगेशकर यांचे नावे आहे. आपटी चोण गावातील ५ लोकांनी नदीकिनारी असलेल्या त्यांच्या जमिनीचे लचके तोडले आहेत. २० ते ३० फूट खोल खड्डे खोदत माती-रेती काढल्याने नदीपात्र नष्ट झाले आहे.गावातील शेतकऱ्यांच्या म्हशी पाणी पिण्यासाठी नदीवर असताना या खड्ड्यात पडून मेल्याच्या घटना मागील वर्षी घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्री जेसीबी, पोकलेन लावून रेती-माती काढून पहाटेच ट्रक रवाना केले जातात. हा सर्व प्रकार तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना माहीत असल्याने, कुणी तक्रार केल्यास कर्मचारी त्वरित रेतीमाफियांना संदेश देतात. यामुळेच आतापर्यंत हजारो टन माती, रेती काढूनही एकही गाडी पकडण्यात महसूल अथवा पोलिसांना यश आले नाही. रेतीउपसा रोखण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला या माफियांकडून ठरावीक मोबदला मिळत असल्याने, ते तक्रारदाराचेच नाव या चोरांना सांगतात. त्यामुळेच तक्रारकर्त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो, म्हणून ते माध्यमांसमोर यायला तयार नसतात.मंगेशकर यांना बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीकिनारी एक पर्यटन केंद्र निर्माण करायचे आहे. उषा मंगेशकर यांनी जमीन मोजणीच्या वेळी माती, रेतीची चोरी होत असल्याचे, तसेच सुपीक मातीच्या जागी मोठे खड्डे पडल्याने ही जागा ओसाड दिसत असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणले होते. आपटी गावातील एका जागृत नागरिकाने या संदर्भात कल्याण तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, यावर अद्याप काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. चौकशी सोपविलेले तलाठी, मंडळ अधिकारी या माफियांना फोन करून तक्रारीविषयी सांगतात. त्यामुळे गावामध्ये वादावादी होते व यातूनच कोणी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही.माझ्या अर्जावर अजूनही कारवाई झालेली नाही, त्यामुळे मी तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण करणार आहे.- जनार्दन शिसवे, ग्रामस्थ, आपटी चोणही बाब गंभीर आहे. यावर कारवाई करण्यात येईल.- उद्धव कदम, निवासी तहसीलदार, कल्याण
भारतरत्न लता मंगेशकर यांनाही रेतीमाफियांचा दणका
By admin | Published: January 29, 2016 1:36 AM