मुंबई : प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएममध्ये झालेली युती ही धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर सत्ताधारी भाजपाला फायदा पोहोचविण्याच्या उद्देशानेच या युतीचा डाव मांडण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारिप आणि एमआयएमने युतीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांच्या संयुक्त सभेचीही घोषणा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. मुस्लीम आणि दलित मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच ही खेळी खेळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार नसीम खान यांनी केला आहे. देशात आणि राज्यात भाजपा आणि शिवसेनेविरोधात धर्मनिरपेक्ष मतांची एकजूट उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रिपब्लिकन गटाच्या सर्वच गटांशी चर्चा सुरू केली आहे. मुस्लीम आणि दलित समाज आता आपल्याला स्वीकारणार नाही याची भाजपा नेत्यांना खात्री पटली आहे. त्यामुळेच या मतांमध्ये फूट पाडण्याची खेळी भाजपाकडून केली जात असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला.प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत राहावे यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. भाजपाला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळावी, यासाठी काँग्रेस भविष्यातही प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे खान यांनी स्पष्ट केले.एमआयएम नेत्यांची प्रक्षोभक भाषणे म्हणजे राजकारणाचा भाग असल्याचे मुस्लीम समाजाला लक्षात आले आहे. एमआयएमचे भावनिक राजकारण भाजपाच्याच पथ्यावर पडत असल्याचे मुस्लीम समाजाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मुस्लीम समाज आता एमआयएमच्या डावपेचांना बळी पडणार नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत याची चुणूक मिळाली आहे. भायखळा येथील एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या मतदारसंघातून एमआयएमचा एकही नगरसेवक निवडून आला नसल्याचे नसीम खान यांनी स्पष्ट केले.भारीप आणि एमआयएमची युती म्हणजे दलित, मुस्लीम मते विरोधी पक्षाला मिळू नयेत यासाठीचे कारस्थान असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. आपल्याला दलित-मुस्लिमांची मते मिळणार नाहीत हे भाजपाला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनीच एमआयएम आणि भारिपचे हे पिल्लू पुढे केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.मुस्लिम मतांसाठी कारस्थानभारीप आणि एमआयएमची युती म्हणजे दलित, मुस्लिम मते विरोधी पक्षाला मिळू नयेत यासाठीचे कारस्थान असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. आपल्याला दलित-मुस्लिमांची मते मिळणार नाहीत हे भाजपाला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनीच एमआयएम आणि भारिपचे हे पिल्लू पुढे केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.
मतांच्या फुटीसाठीच भारिप-एमआयएम युती; काँग्रेस, मनसेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 1:00 AM