मुंबई :सध्या वर्सोवा भागात लोखंडवाला सर्कल परिसरात रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात वर्सोवा विधानसभेच्या आमदार भारती लव्हेकर आणि के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर यांनी महानगरपालिका साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड तसेच एसआरए सीईओ दीपक कपूर यांच्यासोबत बैठक घेऊन जेव्हीएलआर एक्स्टेन्शनसंदर्भात ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यास सांगितल्या आहेत.यासंदर्भात एसआरएसोबत झालेल्या बैठकीत या रस्त्यांमधल्या एसआरए क्षेत्रातील झोपड्यांना त्वरित भाडे देऊन त्या निष्कासित करण्यात येणार आहेत. तसेच ज्या झोपड्या एसआरएमधील नाहीत अशा झोपड्यांना पीएपी देऊन रस्ता मोकळा करण्यात येणार आहे. मनपा साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये एस.व्ही. रोडपासून ते लिंक रोड इन्फिनिटी मॉलपर्यंतचा रस्ता पूर्णत्वास नेण्यात येणार असून संबंधितांना त्वरित काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वर्सोवा, सात बंगला न्यू फिशरीज युनिव्हर्सिटी रोडवरील बॉटलनेकचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे.प्रकल्पबाधित रहिवाशांना त्वरित पीएपी देऊन त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली असून हा बॉटलनेक मोकळा करण्याचे काम सुरू झाले आहे. चार बंगला सिग्नल ते लोखंडवाला सर्कल या अच्युतराव पटवर्धन रोडवरील साइड स्ट्रिप्स डांबरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात लव्हेकर यांनी हे काम १५ दिवसांत पूर्ण करावे, असे आदेश दिले आहेत. तसेच लोखंडवाला बॅक रोड ते वर्सोवाला जोडणाºया ब्रिजचे कामही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘ट्रॅफिक फ्री वर्सोवा’ असे चित्र बघायला मिळेल, अशी माहिती योगीराज दाभाडकर यांनी दिली.
वर्सोव्यातील वाहतूककोंडीवर लवकरच तोडगा- भारती लव्हेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:32 AM