आधी केली मोदींची कॉपी; नंतर मागितली जाहीर माफी; आक्रमक फडणवीसांसमोर जाधवांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:46 AM2021-12-23T05:46:54+5:302021-12-23T05:47:50+5:30
भाजप सदस्यांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांना निलंबित करा किंवा त्यांना तत्काळ माफी मागायला सांगा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली, भाजपच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. शेवटी जाधव यांनी, कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो, असे सांगितले. भाजप सदस्यांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.
मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, अंगविक्षेप करून त्यांची नक्कल इथे सभागृहात करता येते का, ही आपली संस्कृती आहे का, जयंतराव (पाटील) उद्या तुमच्या नेत्यांची आम्ही नक्कल केली तर तुम्हाला चालणारे आहे का, असा हल्लाबोल फडणवीस आणि ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी केला. ‘कोणत्याही नेत्याचा अवमान होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ’, असे सांगत अनिल परब यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘सभागृहात नेत्यांचा अपमान होता कामा नये, ती आपली परंपरा नाही’, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. ‘मी अंगविक्षेप मागे घेतो आणि शब्दही मागे घेतो’, असे जाधव यांनी म्हणताच, अंगविक्षेप मागे कसे घेता येतील, तसे एखादे आयुध आहे का, असा सवाल करीत फडणवीस यांनी त्यांची पुन्हा कोंडी केली. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अंगविक्षेप व शब्दही मागे घेतो, असे जाधव म्हणाले. मात्र, ‘पंतप्रधान २०१४च्या प्रचारात जे बोलले त्यावर मी अजूनही ठाम आहे, माझ्याविरुद्ध हक्कभंग आणाच’, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.