मुंबई : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गुहागरचे माजी आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत 'घरवापसी' केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना शिवबंधन बांधले.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी माझे कोणासोबत भांडण झाले नाही. मी माझ्या आधीच्या घरात आलो आहे. शिवसेनेत परत येण्यासाठी मला माझा अंतरात्मा झोपू देत नव्हता. उद्धव ठाकरे यांनी अंतरात्म्याचा आवाज ओळखला. ज्या वेळेला मी शिवसेना सोडली तेव्हा मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे शिवसेना सोडली असा कधीही आरोप केला नाही. मी कधीच मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत कधीही टीका केली नाही, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेत प्रवेश करण्याआधी भास्कर जाधव यांनी शुक्रवारी औरंगाबादला जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. हरिभाऊ बागडे यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा तात्काळ मंजूर केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते रामदास कदम, सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार उदय सामंत उपस्थित होते.