रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी नाही - हो करता करता अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत वापसी केली आहे. भास्कर जाधव यांना स्वगृही आणण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. याबाबत ‘लोकमत’ने दिनांक ८ सप्टेंबर २०१७ रोजी पहिले वृत्त प्रसिद्ध करून भास्कर जाधव पुन्हा सेनेत येण्याबाबतचे संकेत दिले होते. अखेर दोन वर्षांनंतर भास्कर जाधव यांनी शिवबंधन बांधलेच.
‘मातोश्री’वर मिळालेल्या वागणुकीनंतर भास्कर जाधव यांनी तडकाफडकी शिवसेनला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपला टक्कर देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुहागर मतदार संघातून निवडणुकीला सामोरे जाताना त्यांनी दोनवेळा विजयाची माळ गळ्यात घातली होती. मात्र, दोन वर्षांपासून नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि जिल्ह्यात अव्वल असणाऱ्या शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली.राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणात भाजपला सुगीचे दिवस येऊ शकतात, या भीतीने शिवसेनेने मोर्चेबांधणी करण्यास सुरूवातकेली. नारायण राणे भाजपमध्ये गेले तर त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेत कोणीतरी असावा, यासाठी पक्षातून बाहेर गेलेल्यांना स्वगृही आणण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. उत्कृष्ट संसदपटू आणि आक्रमक नेता म्हणून ओळख असलेल्या भास्कर जाधव यांना पुन्हा सेनेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, भास्कर जाधव यांच्याकडे जाऊन मध्यस्थी करणार कोण? असा प्रश्न सेनेसमोर होता. त्यादृष्टीने पक्षाकडून चाचपणी सुरू होती. ‘नारायण राणेंना टक्कर देण्यासाठी सेनेची तयारी’ अशा आशयाखाली ‘लोकमत’ने ८ सप्टेंबर २०१७ रोजी वृत्त प्रसिद्ध करून जाधव यांच्या सेना प्रवेशाचे संकेत दिले होते.