साण्डू फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष उद्योगपती भास्करराव साण्डू यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:07 AM2021-05-22T04:07:19+5:302021-05-22T04:07:19+5:30
मुंबई : आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे भास्करराव गोविंद साण्डू यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. ...
मुंबई : आयुर्वेदिक औषधांच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे भास्करराव गोविंद साण्डू यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. आयुर्वेदिक क्षेत्रात १२० वर्षांहून अधिक विश्वसनीय परंपरा असलेल्या साण्डू फार्मास्युटिकल्स या कंपनीचे ते अध्यक्ष होते. तब्बल ६० वर्षे ते साण्डू फार्मास्युटिकल्समध्ये कार्यरत होते, तसेच गेली २० वर्षे ते या कंपनीचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील गोविंदराव साण्डू यांच्या आदेशानुसार, त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी कंपनीच्या विपणन विभागात कामाला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीतच कंपनीचा विस्तार देशापलीकडे अधिकाधिक वाढत गेला व कंपनीचे उत्पादन १ हजार टक्क्यांनी वाढले. त्याचप्रमाणे, कर्मचारी वर्गही चार पटीने वाढला. चेंबूर येथील कार्यालय, तसेच नेरुळ व गोवा येथील कारखाना या गोष्टी त्यांच्यामुळे साध्य झाल्या. त्यांनी अनेक डॉक्टरांना आयुर्वेदिक औषधांबद्दल माहिती देऊन त्यांच्यात आयुर्वेदामधील रुची निर्माण केली.
त्यांनी पोद्दार महाविद्यालयातून वाणिज्य पदवी घेतली. त्यांना नेहमी सुदृढ राहण्याची आवड होती, तसेच इतरांनीही सुदृढ राहण्याचा त्यांचा नेहमी आग्रह असे. महाविद्यालयीन जीवनात ते मिस्टर पोद्दारही ठरले होते. त्यांच्यापश्चात त्यांची पत्नी जयश्री साण्डू व मुलं शशांक सांडू, उमेश सांडू आणि डॉ.किशोर सांडू असा त्यांचा परिवार आहे.