इंदू मिलप्रकरणी भाजपाचे आरोप बेताल - सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 04:58 AM2019-01-21T04:58:34+5:302019-01-21T04:59:43+5:30
बेताल वक्तव्ये, अपप्रचार, खोटे बोलणे हा भाजपाच्या निवडणूक रणनितीचा भाग आहे.
मुंबई : बेताल वक्तव्ये, अपप्रचार, खोटे बोलणे हा भाजपाच्या निवडणूक रणनितीचा भाग आहे. त्यामुळेच काँग्रेसला इंदू मिलची जागा बळकवायची होती, असा जावईशोध राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे, अशा शब्दात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत काय केले हे मुख्यमंत्र्यांनी सांगायची आवश्यकता नाही. इंदू मिलमध्ये स्मारक उभारू, असे काँग्रेसच्या निवडणूक जाहिरनाम्यामध्येच सांगितले होते. प्रिन्सिपल
अप्रूवल आणण्याचे कामसुद्धा काँग्रेसने केले, भाजपाप्रमाणे फक्त निवडणुकीसाठी स्मारकाचा वापर आम्ही केला नाही. २०१५ साली
बिहार निवडणुकीआधी, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजन केले पण अजून स्मारकाची एकसुद्धा वीट रचली गेली नाही. राम मंदिराप्रमाणे बाबासाहेब आंबेडकराच्यां स्मारकाचा उपयोग फक्त निवडणुकीपुरता करायचा आहे का, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे सावंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची बदनामी करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते होणार नाही. काँग्रेसला आता सगळ्या दलित, मागसवर्गीय समाजाचा पाठिंबा मिळतो आहे. भाजपाचे सरकार हे आपले नाही हे सगळ्या दलित, मागासवर्गीय समाजाला कळून चुकले आहे. या समाजातील आक्रोश वाढत आहे, त्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी करावी असेही सावंत म्हणाले.