भाऊबीजेला ‘बेस्ट’ दिलासा , संप मागे, बेस्ट कामगारांना साडेपाच हजार बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:23 AM2017-10-19T05:23:35+5:302017-10-19T05:23:52+5:30
बेस्ट कामगारांनी ऐन भाऊबीजेच्या दिवशी संपाचा इशारा दिला होता. प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी याप्रकरणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
मुंबई : बेस्ट कामगारांनी ऐन भाऊबीजेच्या दिवशी संपाचा इशारा दिला होता. प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी याप्रकरणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कामगारांना बोनस जाहीर करण्यात आला असून त्यानुसार प्रत्येकी साडेपाच हजार रुपये बोनस मिळणार आहे. त्यामुळे येत्या शनिवारी होणारा बेस्टचा संप टळला असून, प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पालिका कर्मचाºयांना १४ हजार पाचशे रुपये बोनस जाहीर झाला. मात्र बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कामगारांची मागणी बेस्ट आणि पालिका प्रशासनानेही फेटाळली. त्यामुळे बेस्ट कामगारांनी शनिवारी, २१ आॅक्टोबरला बंद पुकारण्याची तयारी केली होती. वडाळा आगारात बेमुदत आंदोलनाची सुरुवातही झाली होती. रक्षाबंधनच्या दिवशी बेस्ट कामगारांनी पगार वेळेत मिळावा यासाठी संप केला होता. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. याच अडचणींचा सामना पुन्हा भाऊबीजेला करावा लागेल, या भीतीने मुंबईकर त्रासले होते.
मात्र बेस्ट कर्मचाºयांच्या कृती समितीने संपाचा इशारा दिला असताना महापौरांकडे झालेल्या बैठकीत कर्मचाºयांना साडेपाच हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. यासाठी पालिका बेस्टला २५ कोटी रुपये देणार असून, ही रक्कम कर्मचारी आणि अधिकाºयांना बोनस की उचल म्हणून द्यायची? हा निर्णय पालिकेने बेस्ट प्रशासनावर सोपवला आहे.
बोनस की उचल?
पालिका बोनसऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरूपात कर्ज म्हणून, सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देणार आहे. बेस्ट ती कर्मचाºयांना देईल. सदर सुधारणांची प्रक्रिया सुरू झाल्यास दिली जाणारी आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल.
सुधारणांची प्रक्रिया सुरू न झाल्यास दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
पालिकेचे बेस्टला २५ कोटी रुपये : बेस्ट कर्मचाºयांच्या कृती समितीने १८ आॅक्टोबरपासून उपोषण सुरू केले होते. तसेच २१ आॅक्टोबरला भाऊबीजेच्या दिवशी संप करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता बोनस जाहीर केल्याने भाऊबीजेच्या दिवशी होणारा संप टळला आहे. बेस्टच्या ४४ हजार कामगारांना हा बोनस मिळणार आहे. यासाठी पालिकेने बेस्टला २५ कोटी रुपये दिले आहेत.
प्रयत्नांची गरज
बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत पालिकेच्या महासभेत मंजुरी दिली जाईल, असे महापौरांनी बोनस जाहीर करताना सांगितले.