Join us  

Bhavana Gawali: भावना गवळींना ईडीने पुन्हा बजावलं समन्स; पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 8:57 AM

भावना गवळी यांना याआधीही ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.

मुंबई- शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. महिला उत्कर्ष मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत. 

भावना गवळी यांना याआधीही ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. परंतु त्या वेगवेगळ्या कारणांमुळे चौकशीला येऊ शकत नाही, असं ईडीला कळवलं होतं. मात्र आता चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळत आहे. 

भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी देखील भावना गवळी यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. भावना गवळींनी आपल्या बालाजी आर्टीकल फोर्ट कारखान्यासाठी ४४ कोटी रुपये भारत सरकारच्या बँकेचे कर्ज घेतले, ११ कोटी रुपये कर्ज स्टेट बँकांकडून घेतले. 

विशेष म्हणजे हा ५५ कोटी रुपयांचा कारखाना आपल्याच बेनामी कंपनी असलेल्या भावना अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडला केवळ २५ लाख रुपयांत विकला, असा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. त्यानंतर, नवीन बेनामी कंपनीवर आखणी ११ कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. अशाप्रकारे भावना गवळींनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. 

काय आहे प्रकरण?

गवळी यांच्याविरुद्ध हरीश सारडा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आहे. १९९२ मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची स्थापना करून राज्य सरकारच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमकडून ४३ कोटीचे कर्ज मिळविले. २००२मध्ये गवळी यांनी या  कारखान्याची १४ हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. त्यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

टॅग्स :भावना गवळीशिवसेनाअंमलबजावणी संचालनालय