Join us

“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण”; विधान परिषद उमेदवारीवर भावना गवळींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 4:59 PM

Shiv Sena Shinde Group Bhavana Gawali News: विधान परिषदेचे सभागृह नवीन असले, तरी सर्वांच्या सहकार्याने गाजवणार आहे, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.

Shiv Sena Shinde Group Bhavana Gawali News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. भाजपाने पाच जणांच्या नावांची यादी घोषित केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर भावना गवळी यांनी प्रतिक्रिया दिली. 

सध्याचे विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहायचे झाल्यास भाजपाचे १०३ आमदार आहेत. तर भाजपाचे महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्याशिवाय इतर छोटे पक्ष ९ आणि अपक्ष १३ असे एकूण २०१ आमदारांचे पाठबळ महायुतीकडे आहे. सध्याच्या गणितानुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार निवडून येऊ शकतात, असे सांगितले जात आहे. 

मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण

विधानपरिषदेचे सभागृह माझ्यासाठी नवीन आहे. लोकसभेवर अनेकदा निवडून गेले. त्यामुळे लोकसभेचे सभागृह अनेक वर्ष पाहिलेले आहे. विधान परिषद नवीन जरी असली, तरी सर्वांच्या सहकार्याने गाजवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिली. मागच्या वेळेस लोकसभेला उमेदवारी मिळू शकली नाही. त्याची विविध कारणे असतील. काही कारणे असतील, असे राजकारणामध्ये असते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. लाडकी बहीण योजना सरकारने राबवली. तसे म्हणेन की, मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण आहे, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

टॅग्स :विधान परिषदभावना गवळीशिवसेना