Join us  

भावेश नकातेच्या मृत्यूचे दिल्लीत पडसाद

By admin | Published: December 02, 2015 2:26 AM

लोकलमधील गर्दीमुळे रेल्वेबाहेर पडून झालेल्या भावेश नकाते या २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूची गंभीर दखल केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली आहे. प्रभू यांनी उपनगरी प्रवाशांच्या

डोंबिवली : लोकलमधील गर्दीमुळे रेल्वेबाहेर पडून झालेल्या भावेश नकाते या २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूची गंभीर दखल केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली आहे. प्रभू यांनी उपनगरी प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात मंगळवारी मुंबई-ठाणे जिल्ह्यातील खासदारांची दिल्लीत बैठक घेतली. त्यावेळी खासदारांनी रेल्वेच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त केली. मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते ठाणेदरम्यान व दिवा ते कल्याणदरम्यान रेल्वेचे पाचव्या व सहाव्या लेनचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे ते दिवादरम्यानचे काम बंद असून ते पूर्ण झाले नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडतात. हे अपघात टाळण्यासाठी खासदारांनी डब्यांची संख्या वाढवावी, अ‍ॅटोमेटिक डोअर लावावे या मागण्यांसह रेल्वे स्थानकाबाहेर कार्डियाक अम्ब्युलन्स, रेल्वे स्थानकांमध्ये प्राथमिक उपचार केंद्र, लेनच्या शेजारी कंपाऊंड वॉल आदींवर चर्चा करण्यात आली . यावर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी लोकलचे डबे वाढवून १५ करण्यात येतील असे मान्य केले. या बैठीकीला खासदार राजन विचारे, राहुल शेवाळे, विनायक राऊत, अरविंद सावंत, कपिल पाटील, किरीट सोमैया, श्रीकांत शिंदे, गोपाल शेट्टी व इतर अधिकरी वर्ग उपस्थित होते. राजन विचारे यांनी सुरेश प्रभू यांना नवी मुंबईतील प्रवाश्यांना कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसारा येथे जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात यावे लागते. त्यामुळे या ठाणे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाश्यांची गर्दी होते. ते टाळण्यासाठी मंजूर झालेल्या नवीन कळवा ऐरोली एलीवेटेड या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मेंटल हॉस्पिटलच्या जागेवर नवीन रेल्वे स्थानकाची मंजुरी, ठाणे रेल्वे स्थानकांमध्ये सुरू असलेल्या पार्किंग प्लाझाच्या काम, एफओफीचे, सरकते जिने, एसी शौचालय व पूर्वेकडील सॅटीस २ टप्पाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे म्हंटले. उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दरवाजे बंद होणाऱ्या गाड्यांची सेवा तातडीने सुरू करावी, तसेच गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी पाचवी आणि सहावी लाइन टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा मागण्या शिंदे यांनी केल्या.- रेल्वे प्रवासी संघटनांनी डोंबिवलीत रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, लोकल प्रवेशद्वारातील लोखंडी दांडा हा गुळगुळीत असतो, त्यामुळे हात सटकतो. त्या ठिकाणी प्रवाशांना ग्रीप मिळेल अशी उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे सांगून, तशी मागणी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. नेमकी तीच मागणी शिंदेंनीही केली आणि त्याचे प्रभूंनी स्वागत करत विचार करण्यात येइल, असे स्पष्ट केले.प्रवाशांची श्रद्धांजली!रेल्वे अपघातात चार दिवसांपूर्वी मरण पावलेल्या भावेश नकाते त्याचबरोबर अन्य काही प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डोंबिवली उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या सभेस व निदर्शनास मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. प्रवासी संघटना, नागरिक, भाजपा, शिवसेना आणि मनसे या प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.