Join us

‘त्या’ नेत्याचा हट्ट युतीला भोवला

By admin | Published: April 28, 2015 12:18 AM

भाजपाच्या वाटेला असलेला बेलापूर मतदारसंघ पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडे आलाच पाहिजे, या सेनेच्या नेत्याच्या अट्टाहासामुळे युतीची सत्ता हुकली असल्याचे आता समोर येत आहे.

नवी मुंबई : भाजपाच्या वाटेला असलेला बेलापूर मतदारसंघ पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडे आलाच पाहिजे, या सेनेच्या नेत्याच्या अट्टाहासामुळे युतीची सत्ता हुकली असल्याचे आता समोर येत आहे.जागा वाटपावरून युतीत सुंदोपसुंदी झाली होती. शिवसेनेच्या वाट्याला ६८ तर भाजपाच्या वाट्याला ४३ जागा गेल्या होत्या. शहरात युतीविषयी चांगले वातावरण होते. मात्र, जागा वाटपानंतर असंतोष उफाळून आला. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांनंतर त्यात थोडाफार बदल झाला होता. परंतु, नेरूळ येथील मुख्यमंत्र्यांची सभा चांगली झाल्यानंतर शिवसेनेतील एक गट अस्वस्थ झाला. या गटाचा एक नेता बेलापूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्याने आपल्या निवडक सहकाऱ्यांना नेरूळमधील एका गुप्त ठिकाणी बोलावून भाजपाला धडा शिकविण्याचे आवाहन केले. वाटले तर बंडखोरांना मतदान करा, हे सांगण्यासही हा नेता विसरला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नेरूळ, बेलापूरमधील भाजपाचे अनेक उमेदवार पराभूत झाले. आमदार मंदा म्हात्रेंच्या बेलापूर गावातील भाजपा उमेदवाराचाही यात समावेश आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सी.व्ही. रेड्डी हे सुद्धा बंडखोरीमुळे पराभूत झाले. यामुळे विधानसभेसाठी दावा करणाऱ्या शिवसैनिकांच्या ‘काकां’चीही पुरती वाट लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. युतीच्या १२ ते १३ जागा गेल्याने महापालिकेची सत्ता थोडक्यात हुकल्यानंतर या कारस्थानाची चर्चा आता युतीत रंगली आहे. ‘त्या बैठकीस’ एका भाजपा उमेदवाराचा जावई असलेला शिवसेनेचा हरहुन्नरी उमेदवार सुद्धा उपस्थित होता. परंतु, त्याने ‘सासरे बुवां’ना या कारस्थानाचा उलगडा केल्यापासून युतीत चांगलीच जुंपली आहे. या कारस्थानामुळे सासरेबुवांसह त्या उमेदवाराच्या मेहुणीचा पराभव झाला आहे. (खास प्रतिनिधी)