मुंबई, दि. 31 - मुंबईतील जे जे मार्ग परिसरात हुसैनी नावाची सहा मजली इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (31 ऑगस्ट)सकाळी ही दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली 60 ते 65 जण अडकले असून घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले आहे. अग्निशमन दल व एनडीआरएफचे 45 जवानांकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळाला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी भेट दिली. ''सरकारने नैतिक जबाबदार स्वीकारली आहे'', अशी प्रतिक्रिया मेहता यांनी यावेळी दिली. शिवाय,यापुढे कोणतीही दया न दाखवता धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना जबरदस्तीने इमारतीबाहेर काढून त्या रिकाम्या करण्यास भाग पाडू. तसंच येत्या 8 दिवसांत ही कठोर कारवाई करू. ही कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आदेश घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले. दरम्यान, अनधिकृत बांधकाम झाल्याचे चौकशीत कळले तर महापालिका व म्हाडा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी मेहता यांनी दिला आहे. दुर्घटनेनंतर आता संक्रमण शिबिरात लोकांमध्ये पुन्हा घरे मिळवून देण्याचा विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचेही ते म्हणालेत. तोपर्यंत कठोर कारवाई करावीच लागेल. आता सरकार थांबणार नाही, अशी प्रतिक्रियादेखील प्रकाश मेहता यांनी दिली आहे.
हुसेन इमारत धोकादायक होती - पालकमंत्री सुभाष देसाई दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही सकाळी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. हुसैनीवाला ही इमारत धोकादायक होती. या प्रकरणाच्या चौकशीचे तात्काळ आदेश दिले जातील तर प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असं सुभाष देसाई यांनी म्हंटले आहे. दक्षिण मुंबईत बहुसंख्य इमारती धोकादायक आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता तातडीने सोडविला जाईल, असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत. दुर्घटना झालेली इमारत ही धोकादायक असल्याने काही लोकांनी आधीच घरं रिकामी केली होती. पण काही कुटुंब इमारतीत राहत होते. तेच लोक अपघातात सापडल्याचा दावा सुभाष देसाई यांनी केला आहे.भेंडीबाजार पाकमोडिया स्ट्रीट भागात असलेल्या हुसैनीवाला या इमारतीला 2013 मध्ये इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावण्यात आली होती. तरीही काही कुटुंब इमारतीत राहत होती, अशी माहिती समोर येते आहे. दुर्घटना ठिकाणी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसंच स्थानिक लोकांकडूनही बचावकार्य केलं जातं आहे. एनडीआरएफचे ४५ जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीचे एकुण तीन भाग असून त्यातील दोन इमारती कोसळल्या आहेत तर तिसरी इमारत ही आर्धी कोसळली असून इमारतीचा आर्धा भाग तसाच उभा असल्याची माहिती मिळते आहे.इमारतीच्या शेजारी असलेल्या बैठ्या चाळीवर या इमारती कोसळल्या आहेत. ढिगाऱ्याखाली 60 ते 65 जण अडकले असावेत, असं सांगितलं जातं आहे. या दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये एकूण नऊ कुटुंबं राहत होती. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ही इमारत 100 ते 125 वर्ष जुनी असल्याचीही माहिती समोर आली आहे. या इमारतीत एकुण 9 कुटुंबं रहात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. इमारत कोसळल्यानंतर एक-दोन जण स्वतःहून बाहेर आले. हुसेनी इमारतीमध्ये एकूण 12 खोल्या आणि 6 गोडाऊन होते. या गोडाऊनमध्येही लोकं राहत असल्याचं समजतं आहे.
गेल्या महिभरात मुंबई आणि उपनगरात इमारत कोसळल्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी घाटकोपरमध्ये साई दर्शन इमारत कोसळली होती. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी विक्रोळीत इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.