भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्प : ६१० कुटुंबांसह १२८ दुकानदारांना मिळाला हक्काचा निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:09 AM2021-03-04T04:09:01+5:302021-03-04T04:09:01+5:30
मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये वसलेल्या भेंडीबाजारच्या पुनर्विकासाचा विडा सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने उचलला आहे. आतापर्यंत झालेल्या पुनर्विकासाचा विचार करता ...
मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये वसलेल्या भेंडीबाजारच्या पुनर्विकासाचा विडा सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने उचलला आहे. आतापर्यंत झालेल्या पुनर्विकासाचा विचार करता देशातील हा सर्वोत्तम क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असल्याचा दावा ट्रस्टने केला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रहिवाशांच्या खिशातून एकही पैसा न घेता नव्या घरात प्रवेश दिला जात आहे.
भेंडीबाजार येथील १६.५ एकरवर पुनर्विकासाचे काम सुरू आहे. येथील २५० इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. यात एकूण ३ हजार २०० कुटुंबे वास्तव्य करीत होती, तर एकूण १ हजार २५० दुकाने होती. आता पुनर्विकास होत असताना कुटुंबांसह दुकानांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील पुनर्विकासांर्गत एकूण १२ इमारती उभ्या राहणार आहेत. आजघडीला भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ३६ आणि ४२ माळ्यांच्या दोन इमारती उभ्या राहिल्या आहेत.
येथील दोन्ही इमारतींमध्ये ६१० कुटुंबांसह १२८ दुकानदारांना आता हक्काचा निवारा मिळाला आहे. नव्या घरांचे क्षेत्रफळ ३५० चौरस फूट एवढे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथे नव्याने उभ्या राहिलेल्या दोन्ही इमारतींचे काम २०१६ साली सुरू झाले होते. ४५ महिन्यांत ते पूर्ण करण्यात आले. नव्या घरांत रहिवाशांना सर्व सुविधा असून, लहान मुलांना खेळण्यासाठी इमारतीमध्ये उद्यान आहे.
----------
भेंडीबाजार पुनर्विकासाचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला असून, पुढचा टप्पा २०२५ पर्यंत पूर्ण होईल. येथे ३ हजार ५०० वाहने पार्क होऊ शकतात. ७०० झाडे लावली जाणार आहेत.
----------
गेल्या कित्येक दशकांपासून भेंडीबाजारातील ९० टक्के रहिवासी भाड्याने राहत होते. त्यांना हक्काचे घर नव्हते. येथील ८० टक्के इमारती जुन्या झाल्या होत्या. अनेक कुटुंबे ३०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरात राहत होते.